आपलं सरकार पाडल्यावर दारूचे ग्लास हातात घेऊन गद्दार टेबलावर बेधुंद होऊन नाचत होते. गद्दारी सेलिब्रेट करणारे पुन्हा आमदार होऊ शकतात काय, असा सवाल करतानाच या गद्दारांना कायमचे गाडून त्यांच्या उरावर नाचा, असा जबरदस्त घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला. खोक्यांच्या जिवावर गुंडागर्दी, दादागिरी करून दहशतवाद करताय.. चार दिवस राहिलेत, सत्ता भोगून घ्या, नंतर तुम्हाला कधीही विधानसभेचे दार पाहायला मिळणार नाही, असे तडाखेही उद्धव ठाकरे यांनी गद्दारांना लगावले.
मी मुख्यमंत्री असताना कोण ‘कटला’ आणि कोण ‘बटला’?
भाजपच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. मी मुख्यमंत्री असताना कोण बटला आणि कोण कटला, असा सवाल त्यांनी केला. सगळ्यांना सोबत घेत महाराष्ट्र पुढे घेऊन जात होतो. ना जातीपातीत ना धर्मात भेदभाव केला ना विकासात. पण गद्दारांनी आपले सरकार पाडले आणि टेबलावर नाचत दारूचे ग्लास हातात घेऊन गद्दारी सेलिब्रेट केली. या गद्दारांना आता कायमचे गाडण्याची वेळ आली आहे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
चौथे चिन्ह महाराष्ट्र घातक्यांचे
उद्याची विधानसभा निवडणूक महाराष्ट्राच्या अस्तित्वाची आहे. गेल्यावेळी मतांमध्ये विभागणी झाली, पण यावेळी चुकू नका, यावेळी मत फुटले तर नशीब फुटेल आणि पुन्हा सगळे उपरे आपल्या डोक्यावर बसतील. फक्त मशाल, हात आणि तुतारी ही तीनच चिन्हे लक्षात ठेवा, चौथे चिन्ह कोणतेही असो, ते महाराष्ट्र घातक्यांचे आहे, अशी कळकळीची विनंती उद्धव ठाकरे यांनी मतदारांना केली.
वांद्रय़ातील अडलेले पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करू
वांद्रे पूर्व मतदारसंघातील अनेक पुनर्विकास प्रकल्प अडले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते तडीस नेण्याचा प्रयत्न आपण केला होता. परंतु कोरोना आला आणि नंतर गद्दारी झाली आणि दुर्दैवाने ते काम होऊ शकले नाही. पण इथले जे जे पुनर्विकास प्रकल्प अडलेत आणि त्या प्रकल्पांना जे जे नडलेत त्या सगळ्यांना बाजूला फेकून गरज पडली तर सरकारतर्फे ते प्रकल्प पूर्ण करून देईन, कारण तुम्ही इथले मूळ रहिवासी आहात, असे अभिवचन यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले. वांद्रे पूर्व हा माझासुद्धा मतदारसंघ आहे. तुमचे आणि माझे मत एकाच मतपेटीमध्ये पडणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी विचारताच उपस्थितांनी मशाल…मशाल…असा जोरदार प्रतिसाद दिला.
महाराष्ट्राचा घात करेल त्याला गुनसे साथ देणार
शिवसेनेवर टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना यावेळी उद्धव ठाकरे यांनी अनुल्लेखाने हाणले. ते म्हणाले की, जिथे उद्धव ठाकरे, मशाल आहे, शिवसेनाप्रमुखांची शिवसेना आहे, तिकडे भाजपने त्यांच्या ए टीम, बी टीम, सी टीम अशा सर्व टीम कामाला लावलेल्या आहेत. आणखी एक पक्ष आहे कुणीतरी. सुरुवातीला त्याचा झेंडा वेगळा होता, आता झेंडा बदललेला आहे. निशाणी पण कधी इंजिन, कधी इकडे कधी तिकडे. सुरुवातीला मनसे नाव होते, आता गुनसे झाले आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
वांद्रे पूर्व मतदारसंघातील शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार वरुण सरदेसाई आणि कर्जत-खालापूर विधानसभेचे उमेदवार नितीन सावंत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांच्या आज झालेल्या दणदणीत सभांमध्ये उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली.
याप्रसंगी शिवसेना नेते अनिल परब, उमेदवार वरुण सरदेसाई यांनीही मतदारसंघातील मुद्यांकडे लक्ष वेधले.
व्यासपीठावरून उतरले… गर्दीसमोर उन्हात उद्धव ठाकरे यांचे भाषण
कर्जतमध्ये शिवालयासमोरील भव्य मैदानावर दुपारी 1 वाजता उद्धव ठाकरे यांची सभा झाली. टळटळीत ऊन असूनही सकाळी दहा वाजल्यापासून समोर बसलेला प्रचंड जनसमुदाय तसूभरही हलला नाही. हे पाहून उद्धव ठाकरे व्यासपीठावरून खाली उतरले. माझे बांधव आणि माता-भगिनींसमोर उन्हात बसले असताना मी सावलीत उभे राहून भाषण करू शकत नाही, असे सांगताना त्यांनी उन्हात उभे राहात तडाखेबंद भाषण करून कर्जतकरांची मने जिंकली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी गद्दार सेना आणि भाजपवर टीकेचे जोरदार आसूड ओढले.
शेकापच्या जयंत पाटलांनी ठरवायचं, महाराष्ट्रद्रोह्यांना मदत की महाराष्ट्रप्रेमींना?
शेकापचे जयंत पाटील यांनी खरंतर महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहायला हवे, पण ते विचित्रपणे वागत आहेत. अलिबागेत त्यांच्या कुटुंबासाठी मी शिवसेनेची जागा सोडली. त्या बदल्यात ते उरणमध्ये उमेदवार देणार नाहीत असे ठरले. पण शेकापने पेण, उरण आणि पनवेलमध्ये आमच्याविरोधात उमेदवार उभे केले. महाराष्ट्रद्रोह्यांना रोखण्यासाठी एकेक आमदार महत्त्वाचा असताना जयंतरावांनी ठरवायचं की, महाराष्ट्रद्रोह्यांना मदत करायची की महाराष्ट्रप्रेमींना, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
झंझावाती 45 सभा
उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत झंझावाती प्रचार केला. राज्याच्या सर्वच विभागांत उद्धव ठाकरे यांच्या विक्रमी सभा झाल्या. महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा उद्धव ठाकरे यांनी सांभाळली. शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठीही उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली. 4 नोव्हेंबरला अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले आणि 5 नोव्हेंबरपासून प्रचाराचा धडाका सुरू झाला. तेव्हापासून उद्धव ठाकरे यांनी तब्बल 45 सभा घेत राज्य पिंजून काढले. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही राज्यभर दौरा करून 24 सभा घेतल्या. त्या सभांनाही उदंड प्रतिसाद मिळाला.
महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना रेल्वे प्रवास मोफत करायला मोदींना भेटणार
महाझुटी सरकार अर्धवट काम करते. महिलांना अर्ध्या तिकिटात एसटी प्रवास केला. महाविकास आघाडीचे सरकार संपूर्ण प्रवास मोफत करणार आहे, इतकेच नव्हे तर, महिलांना रेल्वे प्रवासही मोफत करावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.