कणकवली, वैभववाडी, देवगड विधानसभा मतदारसंघांत 6 टेबलवर टपाली; तर 14 टेबलवर ईव्हीएम मशीनद्वारे मतमोजणी होणार आहे. एकूण 24 फेऱयांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. यासाठी 116 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. कणकवली विधानसभेचा निकाल दुपारपर्यंत लागण्याची शक्यता असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांनी सांगितले.
मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून कणकवली कॉलेजमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कणकवली मतदारसंघात एकूण 332 मतदान केंद्रे असून यासाठी एकूण 14 टेबलवर मतमोजणी होताना प्रत्येक ठिकाणी 3 कर्मचारी व टपाली मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर 4 कर्मचारी व इतर 50 कर्मचारी मिळून 116 कर्मचारी काम पाहणार आहेत. एका फेरीत 14 केंद्रांची मतमोजणी होणार आहे. त्यावर नियंत्रण करण्यासाठी अधिकारी असणार असल्याचे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी सांगितले. मतमोजणी काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 25 पोलीस अधिकारी, 150 पोलीस, 2 दंगल नियंत्रण पथके तैनात करणार असल्याची माहिती कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी दिली.