सातारा : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात 15 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. असे असले तरी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आ. बाळासाहेब पाटील व महायुतीतील भाजपचे उमेदवार मनोजदादा घोरपडे या दोघांमध्ये पारंपारिक व काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. या दोघांमध्ये नक्की बाजी मारणार कोण? याची उत्कंठा शिगेला पोहोचली असून विजयी होणारा उमेदवार कमी मतांच्या फरकाने असणार आहे, अशीच चर्चा मतदारसंघात सुरू आहे.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ संपूर्ण जिल्ह्यात लक्षवेधक ठरू लागला आहे. या मतदारसंघावर गेली अनेक वर्षे आ. बाळासाहेब पाटील कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत त्यांना मनोजदादा घोरपडे यांच्या रूपाने तगडे आव्हान उभे राहिले आहे. या विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे आ. बाळासाहेब पाटील, महायुतीचे मनोजदादा घोरपडे, बहुजन समाज पार्टीचे कोंडीबा कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे अन्सारअली पटेल, रिपाइं (ए) चे सर्जेराव बनसोडे, राष्ट्रीय स्वराज्य सेनेच्या सीमा पोतदार, रासपचे सोमनाथ चव्हाण, अपक्ष अजय सूर्यवंशी, दीपक कदम, निवृत्ती शिंदे, बाळासो पाटील, बाळासो शिवाजी पाटील, रामचंद्र चव्हाण, वसीम इनामदार, वैभव पवार हे उमेदवार रिंगणात आहेत.
असे असले तरी या मतदारसंघात आ. बाळासाहेब पाटील, मनोजदादा यांच्यातच कडवी लढत होणार आहे. त्यामध्ये बाजी कोण मारणार? याचा फैसला आज होणार आहे. मतमोजणीकडे सार्यांंच्याच नजरा लागून आहेत. प्रत्यक्ष निकाल काय लागतो? हे आता काही तासांतच समजणार आहे. दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी विजयाची गणिते मात्र पक्की बांधली आहेत. त्यामध्ये कुणाला यश येते? हे पाहावे लागणार आहे. त्यामुळे शनिवारी निकालाच्या पहिल्या फेरीपासून कार्यकर्ते लक्ष ठेेवून राहणार आहेत.