Published on
:
04 Dec 2024, 6:02 pm
Updated on
:
04 Dec 2024, 6:02 pm
नवी दिल्ली : गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण देशात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे काही महिलांचा मृत्यू देखील होत आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासह राज्याच्या ग्रामीण भागात या कर्करोगाच्या साध्या चाचण्याही उपलब्ध नाहीत, त्यामुळे कर्करोग पहिल्या टप्प्यात समजून येत नाही. या पार्श्वभुमीवर जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रामंध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या चाचणीची सुविधा उपलब्ध व्हावी आणि एचपीव्ही लसीचा राष्ट्रीय लसीकरण मोहीमेत समावेश केला जावा, अशी मागणी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी लोकसभेत बोलताना केली.
डॉ. प्रशांत पडोळे म्हणाले की, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने ग्रस्त महिलांना विशेष सहाय्यता सरकारने प्रदान करावी, ग्रामीण भागात महिलांमध्ये याबाबत जागृती व्हावी. त्यासाठी सरकारने विशेष लक्ष द्यावे आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत उपचार करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात यावे. कारण प्रशिक्षणाअभावी सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये या कर्करोगाचे निदान होत नाही. त्यामुळे रुग्ण गंभीर होतो. परिणामी काही प्रकरणात मृत्युला सामोरे जावे लागते. म्हणून यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी डॉ. पडोळे यांनी केली.