Published on
:
23 Jan 2025, 1:57 am
Updated on
:
23 Jan 2025, 1:57 am
गारगोटी : येथील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहाच्या सुमारे दहा कोटी रुपयांच्या जागेची विक्री झाल्याच्या चर्चा आहे. शासकीय गोटात एकच खळबळ माजली आहे.
गारगोटी बस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर वर्दळीच्या आणि मध्य ठिकाणी बांधकाम विभागाचे विश्रामगृह आहे. त्याची उभारणी 1984 साली झाली. विश्रामगृहात अनेक मंत्र्यांसह राज्यातील मोठ-माठे नेते, क्लासवन अधिकार्यांनी विसावा घेतला आहे. मात्र, विश्रामगृहाची जागाच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावावर झाली नसल्याने ती जागा खाली करण्याची वेळ आता प्रशासनावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळकत नंबर 536 (अ) मधील सुमारे 27 गुंठे जागेत हे विश्रामगृह आहे. विश्रामगृहाच्या मुख्य इमारतीमध्ये दोन सुट, उपहारगृह आहे. पाठीमागील बाजूस किचन व खानसामाला राहण्याची व्यवस्था आहे. या पाठीमागेही एक इमारत असून सभोवताली मोठाली संरक्षण भिंत आहे. या सर्व इमारतींच्या उभारणीसाठी व देखभालीसाठी शासनाची आजतागायत कोट्यवधी रुपयांची रक्कम खर्ची पडली आहे. गेल्या काही वर्षांपासून खानसामाची बदली झाल्यामुळे या विश्रामगृहातील राबता कमी झाला आहे. विश्रामगृह जागेच्या मूळ मालकाने जागा परस्पर विक्री केल्याची चर्चा असून आजच्या बाजार भावाप्रमाणे सुमारे दहा कोटी रुपयांच्या घरात या जागेचे मूल्य असल्याचे समजते.