Published on
:
23 Jan 2025, 4:42 am
Updated on
:
23 Jan 2025, 4:42 am
नाशिक : गेल्या २९ आॅक्टोबर २०२४ रोजी सुरू झालेली नाशिक-जयपूर विमानसेवा मागील दोन महिन्यांपासून बंद होती. आता पुन्हा एकदा १ फेब्रुवारीपासून ही सेवा सुरू होणार असून, सेवासाठी मंगळवार (दि. २१)पासून बुकिंग सुरू झाले आहे. दरम्यान, या सेवेला पूर्वीप्रमाणेच आताही प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत असून, विमानाचे भाडे तब्बल तेरा हजारांवर पोहोचले आहे.
नाशिकमधून उद्योग, व्यापार, पर्यटन व कौटुंबिक भेटीगाठींसाठी राजस्थानला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, येथून थेट विमानसेवा नसल्याने त्यांची गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर 'इंडिगो'ने गेल्या २९ ऑक्टोबरपासून इंदूरमार्गे नाशिक-जयपूर थेट विमानसेवा सुरू केली होती. मात्र, दृश्यमानतेचा अभाव व अन्य काही तांत्रिक कारणांमुळे १४ डिसेंबरपासून ही सेवा खंडित करण्यात आली होती. उद्योजकांच्या पाठपुराव्यानंतर ही सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याचे बुकिंग मंगळवारपासून सुरू झाले. विमानाच्या ७८ पैकी ५८ आसने दुपारपर्यंत बुक झाल्याने पहिल्याच दिवशीच्या विमानाचे भाडे तब्बल तेरा हजारांवर जाऊन पोहोचले आहे.
ओझर येथून 'गुलाबी शहर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या जयपूरसाठी मंगळवार, गुरुवार व शनिवार असे आठवड्यातील तीन दिवस सेवा दिली जाणार आहे. या तिन्ही दिवशी जयपूर येथून सकाळी ११.२० वाजता उड्डाण घेऊन विमान दुपारी २.२० वाजता ओझरला पोहोचेल, तर ओझर येथून दुपारी २.४० वाजता भरारी घेऊन ते सायंकाळी ५.३० वाजता जयपूरला पोहोचेल. ते इंदूरला वीस मिनिटे थांबणार आहे. ओझर विमानतळावरून सध्या नवी दिल्ली, अहमदाबाद, नागपूर, हैदराबाद, गोवा, इंदूर, लखनौ व बेंगळुरू या ठिकाणांसाठी सेवा दिली जात असून, त्यात जयपूरची भर पडणार आहे.
देशाचा पश्चिमोत्तर भाग कनेक्ट
पिंक सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूरला पर्यटकांचा ओघ मोठा असतो. या सेवेमुळे नाशिकहून जयपूरला जाणाऱ्या पर्यटकांची मोठी सोय झाली आहे. तसेच उद्योजकांनाही या सेवेचा फायदा होणार आहे. या सेवेमुळे नाशिकला राजस्थानसह देशाच्या पश्चिमोत्तर भागाशी थेट कनेक्टिव्हिटी लाभणार आहे.
नाशिकमधून अन्य कंपन्यांनी देखील आपल्या सेवा सुरू कराव्यात यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. एअर इंडिया, अकासा या कंपन्यांशी बोलणी सुरू आहे. चेन्नई, कोलकात्यासाठी सेवा व नवी दिल्लीसाठी आणखी एक विमान सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- मनीष रावल, अध्यक्ष, निमा एव्हियशन कमिटी