Published on
:
23 Jan 2025, 9:17 am
Updated on
:
23 Jan 2025, 9:17 am
सर्व घरगुती व कॉमन वीजजोडण्यांसाठी 30 किलोवॅट क्षमतेचा छतावरील सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारून कोथरूडमधील भाग्यश्री अपार्टमेंटने राज्यात पहिल्या सौर अपार्टमेंटचा मान मिळविला आहे. या अपार्टमेंटमधील सर्व वीजग्राहकांचे मासिक बिल शून्यावर आले आहे. त्यांचा दरमहा 35 हजार रुपयांचा फायदा होत आहे. सोबतच प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून या ग्राहकांना 5 लाख 54 हजार रुपयांचे अनुदान देखील मिळाले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते भाग्यश्री अपार्टमेंटचे रहिवासी आनंद देशपांडे, मंदार देशमुख, सतीश आठवले यांचा नुकताच प्रातिनिधिक गौरव करण्यात आला. या वेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, कार्यकारी अभियंता विजय फुंदे यांची उपस्थिती होती.
कोथरूडमधील रामबाग कॉलनीत असलेल्या भाग्यश्री अपार्टमेंटमध्ये एकूण 10 सदनिका आहेत. दोन वर्षांपूर्वी लिफ्ट, पाण्याचा पम्प आणि दिव्यांसाठी असलेल्या थ—ी फेज वीजजोडणीसाठी इमारतीच्या छतावर 11 किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पामुळे दरमहा 15 ते 16 हजार रुपयांचे वीजबिल शून्यवत झाले. तर गेल्या ऑगस्टपासून महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश काळे, शाखा अभियंता आशुतोष थोरात, जनमित्र कैलास मडावी, कार्यालयीन सहायक विजय त्रिंबके यांनी या अपार्टमेंटमधील प्रत्येक सदनिकेसाठी पीएम सूर्यघर योजनेतून छतावरील सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू केला.
भाग्यश्री अपार्टमेंटकडून प्रधानमंत्री सूर्यघर योजनेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सौर एजन्सीचे दीपक कोटकर यांनीही सहकार्य केले. अपार्टमेंटच्या छतावर सौर पॅनेल्सच्या जागेची पाहणी करण्यात आली. यात 10 सदनिकांच्या वीजजोडण्यांचा मंजूर वीजभार 81 किलोवॅट असला, तरी छतावरील जागेच्या मर्यादेमुळे 19 किलोवॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाची उभारणी शक्य होईल असे दिसून आले. त्यानंतर मासिक वीजवापरानुसार 4 सदनिकांसाठी प्रत्येकी 1 किलोवॅट, 3 सदनिकांसाठी प्रत्येकी 2 किलोवॅट आणि 3 सदनिकांसाठी प्रत्येकी 3 किलोवॅटचे छतावरील सौर प्रकल्प उभारण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे केवळ महिन्याभरात 19 किलोवॅट क्षमतेचे छतावरील 10 सौर प्रकल्प उभारण्यात आले. सर्व सदनिकाधारकांच्या सकारात्मक निर्णयामुळे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा लाभ घेता आला व दरमहा वीजबिल शून्य झाले आहे. या सौर प्रकल्पांसाठी 15 लाख 71 हजार रुपयांचा खर्च आला. त्यातील 5 लाख 54 हजार 520 रुपयांचे अनुदान महिन्याच्या आतच प्राप्त झाले व उर्वरित प्रकल्पाचा खर्च शून्य वीजबिलांमुळे येत्या 4 वर्षांत भरून निघेल याचा आम्हाला आनंद आहे, असे भाग्यश्री अपार्टमेंटचे मंदार देशमुख यांनी सांगितले.
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेसाठी प्राप्त 18 हजार 640 अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी 28.9 मेगावॅटचे 5 हजार 853 छतांवरील सौर प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. हरित ऊर्जेवरील राज्यात पहिले विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन पुण्यात झाले. तसेच टेकवडी (ता. खेड) गावाने राज्यात दुसरे सौरग्राम म्हणून मान मिळवला. आता भाग्यश्री अपार्टमेंटने देखील सर्व वीजजोडण्यांसाठी सौरऊर्जेचा पर्याय निवडला. हा आदर्श इतरही ग्रामपंचायती, सोसायट्या, अपार्टमेंटमधील वीजग्राहक ठेवतील, असा विश्वास आहे.
राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल