वर्ष संपले तरी भूमिपूजनाला मुहूर्त सापडेना
परभणी/गंगाखेड (JanSuvidha Kendra) : तालुक्यातील धारासुर येथील सांस्कृतिक वारसा असलेल्या प्राचीन ऐतिहासिक राज्य संरक्षित स्मारक गुप्तेश्वर मंदिर परिसरातील जनसुविधा केंद्राचे बांधकाम रखडले असुन वर्ष संपले तरी भूमिपूजनाला मुहूर्त सापडत नसल्याने या कामाला लवकर सुरुवात करावी अशी मागणी ग्रामस्थांतुन केली जात आहे.
तालुक्यातील धारासूर येथील ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा (JanSuvidha Kendra) असलेल्या प्राचीन कालीन गुप्तेश्वर मंदिराला राज्य संरक्षित स्मारक घोषित करून मंदिराचे जतन संवर्धनासाठी शासन निर्णयानुसार सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने मंदिर जिर्णोद्धाराच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. श्री गुप्तेश्वर मंदिर जतन संवर्धनासाठी राज्य शासनाने २८ कोटी ५८ लाख रुपये मंजूर केले असुन पहिल्या टप्प्यात १४ कोटी ७९ लाख ९५ हजार रुपये रकमेला वित्तीय मान्यता देण्यात आली आहे.
गुप्तेश्वर भगवंताच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक, भक्त, पर्यटकांकरिता मंदिर परिसरात जन सुविधा मिळाव्या यासाठी जन सुविधा केंद्र उभारण्यात यावे यासाठी श्रीकांत भारतीय यांनी नागपूर येथे २०२३ च्या लक्षवेधी मध्ये शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानुसार (JanSuvidha Kendra) धारासुर येथे शासनाने जन सुविधा केंद्र उभारण्यासाठी ७८ लाख रुपये निधी मंजूर करत प्रशासकीय मान्यता देऊन कार्यारंभ आदेश ही दिला आहे. यास एक वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला तरी धारासुर ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा प्रशासनाच्या निष्काळजी पणामुळे जन सुविधा केंद्र बांधकामाला ना हरकत (एनओसी) देण्यात येत नसल्याने जन सुविधा केंद्र बांधकामाच्या भूमिपूजनास मुहूर्त मिळेत नसल्याची ग्रामस्थ्यांची भावना झाली असुन या कामाला लवकर सुरुवात करावी अशी मागणी ग्रामस्थांतुन केली जात आहे.