पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतलीPudhari Photo
Published on
:
23 Jan 2025, 5:19 pm
Updated on
:
23 Jan 2025, 5:19 pm
सोलापूर : सोलापूरचे सर्व प्रश्न आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असून १०० दिवसात सोलापूरच्या विमानसेवेचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देताना आठवड्यात १ दिवस सोलापूरला येणार असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
पालकमंत्री पदाचा पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच गुरुवारी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. शासकीय अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत येत्या १०० दिवसात २० लाख घरकुलांना मान्यता देऊन त्याच्या बांधकामाच्या अनुदानाचा पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती देत सोलापुरातील जनतेला व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षित असेच काम आपल्याकडून होईल, असे गोरे यांनी सांगितले.
सोलापूरच्या धार्मिक पर्यटनाचा विकास करण्यासाठी मोठा वाव असून ग्रामदैवत श्री सिध्देश्वर, पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मंदिर आणि शेजारच्या तुळजापूरची श्री तुळजाभवानी देवी ही मोठी देवस्थाने येथे आहेत. या तीर्थक्षेत्र पर्यटनाचा विकास करण्यावर आपला भर राहणार असून यामुळे रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल. शहरातील विमानसेवा, पाणीपुरवठा, जिल्हा रुग्णालयातील अडचणी व इतर प्रश्न शंभर दिवसाच्या आत मार्गी लागतील. विमानसेवेबाबत ते म्हणाले, गरज पडली तर दिल्लीत तातडीची बैठक लावू. याबाबत चिंता नको, असेही त्यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरचा मी असल्याने सोलापूरचे सर्व प्रश्न आपल्याला माहित आहेत. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. सर्व प्रश्न आपण हाताळणार असून दर आठवड्यातील एक दिवस जनतेच्या भेटीसाठी सोलापुरात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक शासकीय कार्यालय सीसीटीव्ही कॅमेरे बसवा
जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात सीसीटीव्ही बसवावेत याकरिता आवश्यक निधी नियोजन समितीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार माहितीही यावेळी अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले.