नांदेड : कुंडलवाडीचे दोन पोलीस अधिकारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात pudhari photo
Published on
:
23 Jan 2025, 2:25 pm
Updated on
:
23 Jan 2025, 2:25 pm
कुंडलवाडी : येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे व पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांनी 17000 हजाराची लाच घेताना लाच लुचपत विभागाने दोन्ही अधिकाऱ्यावर मोठी कार्यवाही केली आहे. या कार्यवाहीमुळे तालुक्यातील सर्व अधिकार्याचे धाबे दणाणले आहेत.
कुंडलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत चालू असलेल्या गंजगाव रेती घाटावरून हायवाने रेती वाहतूक करण्यासाठी फिर्यादी लोकसेवक यांच्याकडून सहायक पोलीस निरीक्षक भागवत तुकाराम नागरगोजे,पोलीस उपनिरीक्षक नारायण मारोतराव शिंदे यांनी 25000 हजाराची लाच मागितली तडजोडी अंती 17000 हजारावर देण्याचे मान्य करून फिर्यादीने लाचलुचपत विभाग नांदेड यांच्याशी संपर्क केल्यावर लाचलूचपत विभागाने सापळा रचून दिनांक 23 रोजी दुपारी थेट पोलीस स्टेशन कुंडलवाडी येथे फिर्यादी कडून सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांनी 17000हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडून त्याच्यावर कार्यवाही केली आहे.
गेल्या अनेक दिवसापासून पोलीस अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात रेती माफिया व अवैद्य धंदेवाल्याकडून सर्रास हप्तेखोरी चालू होती तर सर्वसामान्य नागरिकांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार घेऊन गेलेल्या व्यक्तीकडून ही आर्थिक लूट केली जात होती त्यामुळे सर्वसामान्य नागरिक या कार्यवाहीमुळे समाधान व्यक्त करून रक्षकच भक्षक झाल्याची चर्चा शहरात करीत आहेत.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक लाच लुचपत विभाग संदीप पालवे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संजय तुंगार, पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रिती जाधव, पोलीस अमलदार राजेश राठोड, बालाजी मेकाले,ईश्वर जाधव आदींनी केली आहे.