शिवना टाकळी प्रकल्पाच्या कालव्याला भगदाड पडले. तर अज्ञाताने फोडलेला कालवा जेसीबीने बुजविण्यात येत आहे.Pudhari Photo
Published on
:
23 Jan 2025, 2:27 pm
Updated on
:
23 Jan 2025, 2:27 pm
कन्नड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील शिवना-टाकळी मध्यम प्रकल्पाचे आवर्तन नऊ दिवसांपासून सुरू आहे. उजव्या कालव्याच्या हेड टू टेल पाणी अद्यापही पोहोचू शकले नाही. ठिकठिकाणी कालव्याला भगदाड तसेच शेतकऱ्यांकडून कालव्याची फोडफाडी होत असल्याने आवर्तनाची नासाडी होत आहे. यामुळे प्रकल्पाच्या कालवा फोडणाऱ्या विरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हे दाखल करण्याचा इशारा शिवना टाकळी मध्यम प्रकल्प प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
नऊ दिवसांपूर्वी प्रकल्पाच्या डाव्या कालवातून ६० क्यूसेक तर उजव्या कालव्यातून १२० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. बारा किमी लांबीच्या डाव्या कालव्यातून देवगांव (रं) च्या धरणात पाणी पोहोचून धरण भरले. मात्र, वैजापूर तालुक्यात जाणारा ५५ किमी लांबीचा उजव्या कालव्यातून फक्त २१ किमी पर्यंतच पाणी पोहोचू शकले. कालव्याची रखडलेली दुरुस्ती, कालव्याच्या चाऱ्या, पोटचाऱ्या नसल्याने शेतकऱ्यांनी कालवे फोडून पाणी इतरत्र वळविल्याने कालव्याच्या पाण्याचा दाब नसल्याने पाणी पूर्णक्षमतेने पुढे जाण्यास अडचण येत आहे.
नऊ दिवसांत कालव्याच्या पाण्याने अर्धे अंतरही न कापल्याने थेट शेवटपर्यंत पाणी पॊहचण्यास अडथळे येत आहे. उजव्या कालव्याच्या गेट क्र.५ अज्ञात व्यक्तीने जेसीबी यंत्राच्या सहाय्याने फोडून पाणी वळविले, ही बाब पाटबंधारे विभागाच्या लक्षात आल्यानंतर गोणपाट व मातीच्या भरावाने गेट बंद करण्यात आले.
सद्यस्थितीत प्रकल्पात ७६ टक्के जलसाठा असून ज्या उद्देशाने पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले, कालव्याची ठिकठिकाणी गळती होत असल्याने कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचेल म्हणून साशंकता आहे. त्यामुळे पाणी सोडण्याचा उद्देश सफल होताना दिसत नाही.
कालव्यातून पाणी सोडण्याअगोदर कालव्याची पाहणी केल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यानी दिली. मात्र, पाणी सोडल्यावर ज्या प्रमाणात पाण्याची गळती होत असून त्यावर ही पाहणी कागदावरच दिसते. शिवना टाकळी मध्यम प्रकल्प हा तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प असून पाणी पुरवठा सह शेती सिंचनासाठी एक वरदान ठरला आहे.
या प्रकल्पाच्या भरवशावर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी लाखोंचे कर्जे घेऊन शेती सिंचनासाठी विहीर पाईप लाईन केल्या आहेत. जर पाणी असून प्रकल्प रिकामा झाला. तर पुढे काय या भीतीने परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत. सध्या पाण्याचे आवर्तन सुरु असून ते नियोजित वेळी ठिकाणी जात नसून पाणी वाया जात आहे. याकडे तालुक्यातील कोणत्याही लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही.
कालव्यातून पाणी सोडण्याबाबत कालवा समिती च्या मागणीनुसार पाणी सोडण्यात आले. मात्र, ठिकठिकाणी कालवा फोडून पाणी इतरत्र वळविण्याचा प्रकार समोर येत आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. पाण्याचा योग्य वापर न झाल्यास कायदेशीर कारवाई करणार आहोत.
- अशफाक शेख, उपविभागीय अभियंता, शिवना टाकळी