आटपाडी शहरातील मंदिरासमोरील अतिक्रमणावरून वादावादी झाली.
Published on
:
23 Jan 2025, 2:26 pm
Updated on
:
23 Jan 2025, 2:26 pm
आटपाडी : आटपाडी शहरातील रस्त्याचे काम करताना श्री सिद्धनाथ मंदिराचे पावित्र्य राखत काम पूर्ण करण्याची आणि सभामंडपाचे काम पूर्ण करण्याची ग्वाही ठेकेदाराने गुरूवारी (दि.२३) सकाळी दिली. दरम्यान मंदिराचा काही भाग पाडल्याचा निषेध व्यक्त करणारे भाजप युवामोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पाटील समर्थक आणि शिवसेना शिंदे गटाचे दत्तात्रय पाटील यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.
आटपाडी शहरातील श्री सिद्धनाथ मंदिराच्या पुढील काही भाग सार्वजनिक बांधकाम खाते,नगरपंचायतचे मुख्याधिकारी, ठेकेदार आणि लोकप्रतिधींनी संगनमताने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला शासकीय जागा शिल्लक असताना पाडण्यात आल्याचा आरोप आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत भाजप युवामोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी बुधवारी (दि.२२) कार्यकर्त्यांच्या समवेत तीव्र निषेध व्यक्त करत आंदोलन केले होते. मंदिराचे बांधकाम होईपर्यंत रस्त्याचे काम रोखण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला होता.
मंदिराच्या विरुद्ध बाजूला थोडा रस्ता घेतला असता तर मंदिराला धक्का लागला नसता असे यावेळी अनिल पाटील यांनी सांगितले होते. दरम्यान मंदिराच्या लगत काम करताना पाडण्यात झालेल्या भागाचे काम पूर्ण करून मंडप पूर्ववत करण्याची ग्वाही ठेकेदाराने दिली होती. आज (गुरूवारी) सकाळी भाजप, शिवसेना शिंदे गट, स्थानिक नागरिक व ठेकेदार हे मंदिराजवळ जमले. यावेळी भाजप-सेना गटातील कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. मंदिरासमोरील आणि सटवाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण हा स्थानिक वादाचा मुद्दा आणि त्या अनुषंगाने किंवा त्या अडून होणाऱ्या राजकारणातून ही वादावादी झाली. आटपाडी शहरातील साईमंदिर ते साठे चौक दरम्यान होणाऱ्या या रस्त्याच्या कामास सुरुवात झाल्यावर मंदिराचा काही भाग पाडण्याच्या मुद्द्यावरून राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे सध्या मंदिरानंतरच्या रस्त्याचे काम सुरु झाले आहे.