Published on
:
23 Jan 2025, 2:28 pm
Updated on
:
23 Jan 2025, 2:28 pm
यवतमाळ : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. आर्णी तालुक्यातील नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोसदनी घाटाजवळ बुधवार दि. २२ जानेवारीच्या रात्री ही घटना घडली.
हा बिबट्या मागील महिन्याभरापासून उत्तर परिक्षेत्रात वास्तव्यास होता. या परिसरातील शेतकऱ्यांच्या जनावरांना फस्त केल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. वनविभागाचे पथक मागील अनेक दिवसापासून या बिबट्याच्या मागावर होते. या बिबट्याचे वय पाच ते सात वर्षांचे असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविल्या जात आहे. पाण्याच्या शोधात महामार्ग ओलांडत असतांना अज्ञात वाहनाने या बिबट्याला जोरदार धडक दिल्याने जागीच ठार झाला.
घटनेची माहिती मिळताच उत्तर वनपरिक्षेत्र व दक्षिण वनपरिक्षेत्राचे अधिकारी व पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतक बिबट्याला आर्णी वनपरिक्षेत्रात आणून डॉ. अरुण आडे यांनी शवविच्छेदन केले. दरम्यान गुरुवारी मृत बिबट्यावर लोणबेहळ येथील जंगलात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी सहायक वनसरक्षक दादासाहेब तौर, नितीन वानखडे वनपरीक्षेत्र अधिकारी, विश्वंभर जाधव, क्षेत्र सहाय्यक लोणबेहळ गौतम बरडे, वनरक्षक निलेश चव्हाण, वनरक्षक आकाश मोरे, उद्धव बुद्धवंत, लक्ष्मण भिसे, पुंडलिक खत्री उपस्थित होते