एकीकडे बांगलादेश नागरिकांच्या वास्तव्याचा मुद्दा गाजत असतानाच आता ठाणे जिल्ह्यात आता बांगलादेशी नागरिकांवर मोठी कारवाई झाली आहे. या प्रकरणात मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (Anti-Human Trafficking Unit) बांगलादेशी नागरिकांचे कोम्बिंग ऑपरेशन सुरु केले आहे. बांगलादेशी नागरिकाने अभिनेता सैफ अली खान याच्या निवासस्थानी शिरकाव करीत त्याच्यावर हल्ला केल्यानंतर बांगलादेशी वस्तीचा मुद्दा प्रचंड गाजत आहे. त्यातच आता ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक वस्ती करुन राहात असल्याचे उघड झाले आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मीरा-भाईंदर आणि वसई-विरार भागात बांगलादेशी नागरिक मोठ्या प्रमाणात राहात असल्याचे गुप्त माहिती मिळाली होती.या पथकाने विविध विभागात छापे टाकून तिघा बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. बांगलादेशी नागरिकांना सुरक्षेतील त्रुटीचा फायदा घेत सीमेवरून भारतात घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे. त्यांच्याकडील कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे नागरिक भारतात कामाच्या शोधात आले होते. त्यांनी येथील विविध कारखाने, बांधकाम स्थळे आणि इतर ठिकाणी काम करून आपली गुजराण केली असल्याचे उघडकीस आले आहे.
या बांगलादेशी नागरिकांकडे ओळख सिद्ध करणारी कागदपत्रे आढळून आलेली नाहीत. या घटनेनंतर पोलिसांनी यामागे मानवी तस्करीचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली आहे. या तीन जणांवर परकीय नागरिक कायदा, 1946 (Foreigners Act) आणि भारतीय दंड संहिता ( Indian Penal Code) अंतर्गत विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघा आरोपींना न्यायालयात हजर करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा
नागरिकांनी सावध रहावे
बेकायदेशीर परदेशी नागरिकांविरोधात कठोर पावले उचलली जात आहेत. नागरिकांनी सतर्क राहावे, कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही कारवाई केवळ मीरा-भाईंदर आणि वसई-विरार परिसरा पुरती मर्यादित नसून, मानवी तस्करी आणि बेकायदेशीर स्थलांतराच्या मोठ्या समस्येकडे लक्ष वेधणारी आहे. पोलीस तपास पूर्ण झाल्यावर या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्या येत आहे.
पुण्यात कागदपत्रांचा ढीग सापडला
पुण्यात देखील बांगलादेशी नागरिकावर कारवाई करण्यात आली आहे. अटक केलेल्या बांगलादेशी घुसखोराकडून बनावट कागदपत्रांचा ढीग सापडला आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरातील महर्षीनगर मधून या आरोपींना अटक करण्यात आली आहे. या बांगलादेशी घुसखोराकडून बनावट आधार कार्ड, मतदान कार्ड, डेबिट कार्ड यासारखे विविध बनावट कागदपत्रे सापडली असून एहसान हाफिज शेख असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शेख हा २००४ पासून पुण्यात वास्तव्यास होता अशी माहिती उघडकीस आली आहे. त्याच्याकडे ८ पॅनकार्ड, १५ आधारकार्ड, २ मतदान कार्ड, २ ड्रायव्हिंग लायसन्स, ३ पासपोर्ट, ९ डेबिट कार्ड, ८ क्रेडिट कार्ड जप्त केले आहेत. शेखकडून ३ शाळा सोडल्याचे दाखले, ८ जन्म दाखले हे देखील जप्त केले आहेत. पाकिस्तान, सौदी अरेबिया, कुवैत, कतार, यूएई आणि मलेशिया या देशांच्या चलनी नोटा सुद्धा केल्या जप्त केल्या आहे. पतित पावन संघटना, क्रांतिवीर सेना, सकल हिंदू समाज आदी विविध संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी शेख याला पकडून पोलिसांच्या हवाली केले होते. शेख याने बांगलादेशींना कागदपत्रे तयार करुन मदत केल्याचे उघडकीस आले आहे.