सुषमा नेहरकर-शिंदे
राजगुरुनगर : आशिया खंडातील सर्वांत मोठी, केंद्र व राज्य शासनाला दरवर्षी शेकडो कोटींचा कर देणार्या चाकण, भोसरी एमआयडीसीतील उद्योजक येथील गुंडगिरी, हप्तेवसुली, खंडणीमुळे हैराण झाले आहेत. त्यात आता दिवसाढवळ्या कंपनीत येऊन मालकावर गोळीबार प्रकरणानंतर तर अनेक उद्योजकांनी धास्ती घेतली आहे. पोलिस प्रशासनाकडून अपेक्षित असे सुरक्षित वातावरण दिले जात नाही. चाकण एमआयडीसीतील गुन्हेगारांना, खंडणीखोरांना लाभलेल्या राजकीय वरदहस्तामुळे चाकण एमआयडीसीतील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत असून, भविष्यात याचा वाईट परिणाम गुंतवणुकीवर होऊ शकतो, अशा भावना उद्योजकांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केल्या.
पुणे जिल्ह्यासह खेड, चाकण, भोसरी परिसरातील गुन्हेगारी गेल्या काही वर्षांत वाढली आहे. खंडणीचे गुन्हे, हाणामारी, हत्या, कोयता गँग, महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यातच नुकतीच चाकण एमआयडीसी परिसरात एका स्टील कंपनीच्या मालकावरच दिवसाढवळा गोळ्या झाडून जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चाकण एमआयडीसीचे सर्वात मोठी एमआयडीसी म्हणून जसे नाव आहे, तसे आता सर्वाधिक गुन्हेगारी व दहशतीचे वातावरण असलेली एमआयडीसी म्हणून देखील नावारूपास येत आहे. याला जबाबदार येथील राजकीय नेते, लोकप्रतिनिधी व पोलिस प्रशासन आहे. सध्या चाकण एमआयडीसीतील विविध कंपन्यांमध्ये कामांचे ठेके, स्क्रॅपचे कॉन्ट्रॅक्ट, कॅन्टीनचा ठेका असो की साधी नोकरी देण्यासाठी काही सराईत गुन्हेगार, काही स्थानिक नेतेमंडळी एवढेच नाही, तर काही पोलिस अधिकारी, काही मंत्री सातत्याने कंपनीच्या मालकांवर, व्यवस्थापकांवर दबाव आणतात. यामधूनच गुन्हेगारीला वाव मिळत असून, या सर्व प्रकारांना कंपनीचे मालक वैतागले आहेत.
चाकण एमआयडीसीतील एका कंपनीच्या मालकावर भरदिवसा कंपनीत येऊन गोळीबार करण्यात आला. यामुळेच चाकण, भोसरी व लगतच्या सर्वच औद्योगिक वसाहतीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चाकण एमआयडीसीत तर असे प्रकार आता वारंवार होत असून, सराईत गुन्हेगाराची मोठी दहशत निर्माण झाली आहे. याबाबत पोलिस प्रशासन, एमआयडीसी प्रशासनाकडून उद्योजकांना, गुंतवणूकदारांना कोणतेही सुरक्षित वातावरण दिले जात नाही. याचा भविष्यात एमआयडीसीतील गुंतवणुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो. यासाठी आता फेडरेशनच्या वतीने थेट मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र देऊन यात लक्ष घालण्याची विनंती करण्यात येणार आहे.
दिलीप बटवाल, सचिव, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज