News9 Global Summit Germany : देशातील नंबर-1 न्यूज नेटवर्क TV9 च्या News9 ग्लोबल समिटला जर्मनीत सुरुवात झाली आहे. या महासमिटमध्ये भारत आणि जर्मनीमधील संबंध अधिक मजबूत करण्यासोबतच दोन्ही देशांच्या स्थायी विकासाच्या रोडमॅपवर चर्चा होत आहे. या चर्चेत दोन्ही देशांमधील राजकीय नेते, प्रसिद्ध व्यक्ती, दिग्गज खेळाडू आणि कॉर्पोरेट लीडर्स सहभागी झाले होते. आता न्यूज 9 ग्लोबल समिटमध्ये दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया सहभागी झाले होते. “स्टुटगार्टच्या या फुटबॉल मैदानात एखाद्या मीडिया संस्थेने अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी कोणत्याही भारतीय सोडा, जगातील मीडिया संस्थेकडूनही अशाप्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नाही. Tv9 नेटवर्कने ऐतिहासिक सुरुवात केली आहे. खेळ ही फक्त शारीरिक क्रिया नाही तर खेळामुळे एक टीम तयार होते. एक विशिष्ट भागीदारी निर्माण होते आणि लोकांमध्ये नाते निर्माण होते”, असे मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले.
भारत आणि जर्मनीमध्ये अनोखं नातं
“भारत आणि जर्मनीमधील अंतर हजारो किलोमीटर दूर आहे. जर्मनी हे इंजिनिअरिंग उत्कृष्टतेसाठी ओळखले जाते. आपण जर स्टुटगार्टमध्ये पाहिले तर येथे पोर्श, मर्सिडीज बेंझ आहे. भारतातील 70 टक्के लोकसंख्या ही 35 वर्षांपेक्षा कमी आहे. भारत आणि जर्मनी यांनी एक अनोखं नातं तयार केले आहे. ते त्यांचं नात जगासमोर एक आदर्श म्हणून नक्कीच ठेवू शकतात”, असेही मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटले.
“जर्मनीमध्ये 1920 मध्ये भारतीय समजाचे काही लोक होते, आज त्यांची संख्या लाखोंमध्ये आहे. आपण भारतीय जगाला आपली ताकद दाखवत आहोत. भारताची क्षमता आणि जर्मनीचे कौशल्य एकत्र आल्यानंतर जगासमोर एक नवीन उदाहरण येऊ शकते. आज 50 हजार विद्यार्थी जर्मनीमध्ये शिकत आहेत. ज्यामुळे भारत आणि जर्मनीचे नाते अधिक घट्ट होत आहे. याचे कारण भारताचे 4 स्तंभ आहेत आणि ते म्हणजे लोकशाही, लोकसंख्या, डेटा आणि डिमांड”, असेही मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारतात अनेक बदल
“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या १० वर्षात स्वतःला बदलले आहे. भारताने अनेक गोष्टी साध्य केल्या आहे, ज्या आपण गेल्या ६ दशकात साध्य केल्या नव्हत्या. आपण फक्त टेलिकॉमबद्दल बोललो तर गेल्या एका दशकात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ही 250 दशलक्ष वरून 970 दशलक्ष झाली. तर ब्रॉडबँडचे वापरकर्ते 60 दशलक्षवरुन 924 दशलक्ष झाले आहेत. भारतात आज १.१६ अब्ज मोबाईल ग्राहक आहेत”, अशी माहितीही ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली.
भारत-जर्मनी मिळून प्रगतीचा नवीन अध्याय लिहू शकतात
“रवींद्रनाथ टागोर अनेक वेळा जर्मनीला गेले होते. त्यांनी येथील विचारवंत आणि तत्त्वज्ञांना भारतातील शांती निकेतनला भेट देण्याचे निमंत्रण दिले होते. भारत आणि जर्मनी यांच्यात विचार, साहित्य आणि आविष्कारांच्या देवाणघेवाणीचे संबंध आहेत आणि आपले लोक या नात्याचे दूत आहेत. भारतातील लोक हे कायम सहकार्याचे नवीन दरवाजे उघडतात. गेल्या दशकात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने मोठी कामगिरी केली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही ही बाब आपल्यासमोर ठेवली होती.
“यंदाच्या अर्थसंकल्पात पंतप्रधान मोदींनी देशात पंतप्रधान इंटर्नशिप योजना जाहीर केली आहे. यात पहिल्या वर्षी 1 लाख 25 हजार विद्यार्थ्यांना देशातील मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. यात भारत-जर्मनी मिळून जागतिक प्रगतीचा नवा अध्याय लिहू शकता. आपण वसुधैव कुटुंबकम म्हणजे जग हे एक कुटुंब आहे असे म्हणतो आणि याच विचारावर आपला देश चालतो”, असेही ज्योतिरादित्य सिंधियांनी म्हटले.