Published on
:
22 Nov 2024, 9:49 am
Updated on
:
22 Nov 2024, 9:49 am
कडेगाव : पुढारी वृत्तसेवा
बोंबाळेवाडी (शाळगाव) ता. कडेगाव येथील एमआयडीसीतील "मॅनमार" कंपनीत काल (गुरूवार) रोजी सायं 6.30 वाजण्याच्या सुमारास वायू गळती झाली. यामुळे संपूर्ण एमआयडीसी परिसर आणि शेजारच्या वस्तीवर विषारी वायू पसरला. यामध्ये दोन महिला व एक पुरुष असे तिघांचा उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला. नीलम रेटरेकर ( रा. मसूर ता. कराड), सुचिता उतळे (रा. येतगाव), किशोर सापकर (बोंबालेवाडी ता. कडेगांव) अशी या घटनेत मृत व्यक्तींची नावे आहेत.
तर या घटनेत कंपनीतील कामगार आणि शेजारच्या वस्तीतील जवळपास सात नागरिकांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. या सहा जणांना श्वासोश्वास, डोळ्यात जळजळ आणि उलट्या होऊन गंभीर त्रास होऊ लागल्याने त्यांना तात्काळ कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या घटनेने परिसरात हादरून गेला असून लोकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मॅनमार कंपनीमध्ये शेती खत निर्मिती केली जाते. दरम्यान या कंपनीत गुरुवारी सायंकाळी अचानक मोठा आवाज झाला आणि वायू गळती झाली. यावेळी गळतीमुळे कार्यरत असलेल्या कर्मचार्यांची दैना उडाली. दरम्यान वायू गळतीने उग्ररूप धारण केले. यामुळे परिसरातील नागरिकांनाही त्रास होऊ लागला. लोक जीव मुठीत घेवून धावू लागले.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच कडेगावचे तहसीलदार अजित शेलार आणि पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख घटनास्थळी पोहोचले आणि पाहणी केली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. परंतु गळती झालेला वायू कोणता होता याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.
या घटनेतील सुचिता उतळे (रा. येतगाव ता कडेगांव) यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांच्या सासू सखुबाई रंगराव उथळे यांना मोठा धक्का बसला. शुक्रवार ( दि. 22 ) रोजी सून सुचिता यांच्या अंत्यसंस्कार दरम्यानच सासू सखुबाई यांचाही दुर्देवी मृत्यू झाला.