जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यानजीक रेल्वे अपघाताची दुर्दैवी घटना घडली. या अपघातामधील मृतांचा आकडा वाढला असून मृतांची संख्या 13 वर पोहोचली आहे. तर या दुर्घटनेत आत्तापर्यंत 12 जण जखमी झाले असून सर्वांवर पाचोरा येथील वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. काल ( बुधवार) संध्याकाळी 5च्या सुमारास जळगाव येथील पाचोऱ्याजवळ पुष्पक एक्प्रेस उभी होती, मात्र तेव्हाच गाडीला आग लागल्याची अपवा पसरली. ती ऐकून घाबरलेल्या काही प्रवाशांनी एक्स्प्रेसमधून खाली उडी मारली आणि समोरून दुसऱ्या ट्रॅकवरून आलेल्या एका रेल्वेने त्या प्रवाशांना उडवलं. त्यामध्ये एकूण 13 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला असून 12 हून अधिक जखमी आहेत.
पाचोरा येथील अपघातानंतर सर्व मृत प्रवाशांचे मृतदेह एकाच वेळी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मयत व्यक्तींपैकी आतापर्यंत सात जणांची ओळख पटलेली आहे. तर रात्री उशीरा सहा जणांचे शवविच्छेदन करण्यात आले. जिल्हा रुग्णालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच मध्यरात्री शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया पार पडली. उर्वरित 6 जणांची अद्यापही ओळख पटलेली नसून त्यांची ओळख पटवण्याचा आव्हान प्रशासनासमोर आहे. ओळख पटलेल्या मृत नागरिकांपैकी काही जण नेपाळचे असून तिघे हे उत्तर प्रदेशचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या अपघाताप्रकरणी पाचोरा शहर पोलीस ठाण्यात कलम 194 अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृतांचे नातेवाईक रुग्णालयात दाखल
हे सुद्धा वाचा
जळगावातील रेल्वे घटनेमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींचे नातेवाईक हे जळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल होत आहेत. मयत व्यक्तींची ओळख पटल्यानंतर संबंधितांच्या नातेवाईकांना जिल्हा प्रशासना तर्फे कळवण्यात आलं होतं. त्यानुसार मृत व्यक्तींची ओळख पटवून मृतदेह ताब्यात घेण्यासाठी अनेक नातेवाईक हे जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल होत आहेत. मयत व्यक्तींचे मृतदेह नेण्यासाठी आवश्यक पेट्या या ठिकाणी आणण्यात आलेले असून प्रशासनाची तयारी सुरू आहे. ज्या ज्या माहित व्यक्तींची ओळख पटलेली आहे त्या व्यक्तींचे मृतदेह सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्या नंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अफवा पसरवणाऱ्या चहावाल्याचा शोध सुरू
पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरल्याने ही दुर्घटना घडल्याचं उघड झालं. तसेच एका चहावाल्यानेच ही अफवा पसरवल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस या चहावाल्याचा आणि एक्सप्रेसची चेन खेचणाऱ्याचा शोध घेत आहेत. पाचोऱ्यातील काही जखमींना भेटून पोलिसांनी त्यांचा कबुलीजबाब घेतला आहे. घटना कशी घडली? नेमकं काय घडलं? याची माहिती पोलीस घेत आहेत.
या तपासातूनच चहावाल्याने एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरवल्याने ही दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. चहावाल्याने अफवा पसरवली आणि दुसऱ्या तरुणांने एक्सप्रेसची चैन खेचली. त्यामुळे एक्सप्रेसने जोरात ब्रेक मारला. त्यामुळे चाकांमधून आगीच्या मोठमोठ्या ठिणग्या उडाल्या. त्यामुळे एक्सप्रेसला आग लागल्याच्या अफवेवर प्रवाशांचा विश्वास बसला आणि त्यांनी मागचा पुढचा विचार न करता धडाधड एक्सप्रेसमधून उड्या मारल्या, असे समोर आले.
असा झाला अपघात
ही ट्रेन परांडा रेल्वे स्थानकाजवळ येत होती. तितक्यात पुष्पक एक्सप्रेसच्या मोटरमनने ब्रेक दाबल्याने एक्सप्रेसच्या चाकांमधून आगीच्या ठिगण्या उडाल्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरली. या अफवेमुळे बायका मुलांमध्ये एकच गोंधळ उडाला. एक्सप्रेसमधील लोक हादरून गेले. आवाज आणि किंचाळ्या सुरू झाल्या. प्रवाशी या प्रकाराने चांगलेच हादरून गेले होते. त्यामुळे 35 ते 40 प्रवाशांनी एक्सप्रेसमधून पटापट उड्या मारल्या. समोरून गाडी येते की नाही याची खातरजमाही त्यांनी केली नाही. तेवढ्यात समोरून बंगळुरू एक्सप्रेस आल्याने बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडलं. त्यात आत्तापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक जखमी आहेत.