चिपळूण : युनायटेड इंग्लिश स्कूलमधील मतदान यंत्रे ठेवलेल्य स्ट्रॉगरूमच्या सुरक्षेची माहिती घेताना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रांताधिकारी आकाश लिगाडे आदी.pudhari photo
Published on
:
22 Nov 2024, 5:16 pm
Updated on
:
22 Nov 2024, 5:16 pm
रत्नागिरी : राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवार 23 नोव्हेंबर रोजी लागणार असून रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी थेट लढत होत आहे. जिल्ह्यातील पाचही लढती अटीतटीच्या दिसत असून मतदारांनी कुणाच्या पारड्यात आपले दान टाकले आहे हे दुपारी स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यात ठाकरे सेना की शिंदेंच्या शिवसेनेचे वर्चस्व राहणार हे उघड होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यावर आतापर्यंत शिवसेनेचे एकहाती वर्चस्व होते. त्यातही शिवसेनेचे दोन भाग झाल्यानंतरही ठाकरेंकडे आ. भास्कर जाधव व आ. राजन साळवी यांनी राहणे पसंत केले तर आ. योगेश कदम आणि उदय सामंत यांनी शिंदे शिवसेनेला साथ दिली. त्यामुळे खर्या अर्थाने या निवडणुकीत कोणत्या शिवसेनेचे वर्चस्व राहणार, याकडे जनमाणसांचे लक्ष लागले आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात ‘उबाठा’ शिवसेनेचे भाजपाकडून आलेले बाळ माने उभे आहेत. सुरुवातीला ही लढत रंगतदार होईल, अशी चर्चा होती. मात्र मतदानानंतर ती शक्यता मावळली असल्याचे दिसून आले. त्यामुळे उदय सामंत यांच्या विजयात किती ‘लीड’ असेल याचेच औसुक्य नागरिकांमध्ये आहे.(Maharashtra assembly polls)
शेजारच्याच राजापूर विधानसभा मतदारसंघात उबाठाचे आमदार राजन साळवी यांच्याविरोधात शिंदे शिवसेनेकडून उद्योगमंत्र्यांचे मोठे बंधू किरण सामंत रिंगणात आहेत. या ठिकाणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड हे बंडखोरी करीत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात होते. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदेंची शिवसेना उबाठाला धोबीपछाड देणार का, याचीच चर्चा मतदारांमध्ये सुरु आहे.
जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उबाठाचे भास्कर जाधव रिंगणात असून त्यांच्या विरोधात शिंदे शिवसेनेकडून राजेश बेंडल रिंगणात आहेत. ही निवडणूकही रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. या ठिकाणी भास्कर जाधव यांना जोरदार लढत मिळण्याची शक्यता आहे. याठिकाणी ‘कुणबी फॅक्टर’ व भाजपची मदत राजेश बेंडल यांना विजयाचे दार उघडे करते काय, याकडेही येथील मतदारांचे लक्ष लागले आहे.(Maharashtra assembly polls)
जिल्ह्यातील सर्वाधिक रोमांचक लढत चिपळूण मतदासंघात होत असून राष्ट्रवादी अजित पवार राष्ट्रवादीकडून आ. शेखर निकम तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रशांत यादव रिंगणात आहेत. दोघेही मातब्बर असून कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील आणखी एका लढतीकडे लक्ष लागले असून दापोली मतदारसंघात विद्यमान आमदार योगेश कदम यांच्यासह माजी आमदार संजय कदम हे उबाठाकडून रिंगणात आहेत. दोघांनीही मतदानानंतर फटाक्यांची आतषबाजी करीत आपणच विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे ही लढतही जोरदार होणार आहे.
सकाळी साडेआठ वाजता ईव्हीएम मशिनमधील मतांची मोजणी सुरु होणार असल्याने साडेदहा-अकरा वाजल्यानंतर खर्या अर्थाने कोणकोणत्या मतदारसंघात आघाडीवर असेल, हे स्पष्ट होणार आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत निकाल लागणार लागणार असल्याने या जिल्ह्यात कुणाचे वर्चस्व राहणार हे स्पष्ट होणार आहे.(Maharashtra assembly polls)