Published on
:
17 Nov 2024, 11:40 am
Updated on
:
17 Nov 2024, 11:40 am
कल्याण-डोंबिवलीतील चारही मतदारसंघातल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार एकीकडे शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. तर दुसरीकडे निवडून निवडून येणार कोण...? आपलं मत कुणाला...? अशा गल्ली-बोळांत आरोळ्या ठोकणाऱ्या मजुरांची मागणी देखिल वाढली आहे. मतदारांच्या थेट दारापर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांची तगडी प्रचारक फौज बहुतांशी पक्षांच्या उमेदवारांकडे पुरेशा प्रमाणात नाही. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातील फेऱ्यांमध्ये गर्दी दिसण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी चाळी व झोपडपट्ट्यांतील हातावर पोट भरणारे रहिवासी, कामगार नाक्यांवरील मजुरांना 1500 ते 2000 रूपये देऊन रोजंंदारीवर प्रचार सुरू केल्याचे दिसून येते.
सोमवारी (दि.18) संध्याकाळनंतर प्रचाराचे भोंगे, आरोळ्या, घोषणा, फेऱ्या बंद होणार आहेत. मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. 20 नोव्हेंबरला उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. त्यामुळे आता प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदानाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे तशी प्रत्येक उमेदवाराची धाकधूक वाढली आहे. तरीही आपलाच प्रचार जोरात दाखविण्यासाठी उमेदवारांमध्ये स्पर्धा लागल्या आहेत. त्यामुळे आपल्या प्रचार फेऱ्यांमधील गर्दी मोठ्या संख्येने दिसायला हवी यासाठी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची धावपळ सुरू झाली आहे. राजकीय पक्षांत पहिल्यासारखे निष्ठावान आणि उन्हातान्हात फिरणाऱ्या कार्यकर्त्यांची वानवा आहे. सतरंज्या आणि खुर्च्या लावणारे उचलणारे कार्यकर्ते कमी झाले आहेत. आताच्या कॉर्पोरेट कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या साह्याने आक्रमक प्रचार करणे अशक्य असल्याने उमेदवारांनी आपला सर्वाधिक भर रोजंदारीवर मिळणाऱ्या प्रचारकांच्या गर्दीवर दिला आहे. चाळी आणि झोपडपट्ट्यांतील रहिवासी, रोजंदारीसाठी नाक्यांवर थांबणारे मजूर यांच्या साह्याने अनेक उमेदवार त्यांच्या प्रचारासाठी गर्दी जमवून आपापल्या मतदारसंघांमध्ये प्रचार फेऱ्या काढत आहेत.
प्रचारफेरीपुढे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि त्यांच्या मागे रोजंदारीवर आणलेले प्रचारक कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात दिसून येतात. दिवाळीनंतर उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केली तेव्हा भाड्याने आणलेल्या प्रचारकांना 250 ते 500 रूपये दिवसाची मजुरी दिली जात होती. त्या सोबत नास्ता म्हणून चहा, वडा-पाव, समोसा-पाव, पाण्याच्या बाटल्या, दुपारचे जेवण अशी सोय केली जात होती. महिलांना 500 रूपये तर पुरूषांना 600 रूपये मजुरी दिली जात होती. काही पुरूष मजुरांना रात्रीच्या श्रमपरिहाराची व्यवस्था करून देण्यात येत होती. आता शेवटच्या टप्प्यातील प्रचार फेऱ्यांसाठी लागणाऱ्या मजुरांच्या रोजंदारीचा भाव देखिल शिगेला पोहोचला आहे.
मजूर आणण्यासाठी काही ठराविक मंडळी (दलाल) अर्थात नाका कामगारांचे कथित नेते खास प्रयत्न करत असतात. मजुरांना एकगठ्ठा घेऊन येणारे कामगारांचे कथित नेते आमच्या रोजंदारीवर फाळका मारत असल्याचे काही मजुरांनी सांगितले. उमेदवाराकडून मिळणाऱ्या रोजंदारीतील 50 ते 100 रूपये परस्पर कापून स्वतःचे खिसे भरत असल्याचा प्रकार समजल्यानंतर मजुरांनी प्रचाराकडे पाठ फिरवली. परिणामी अनेक उमेदवारांना भाड्याच्या प्रचारकांचा तुटवडा जाणवू लागला आहे. प्रचारासाठी गर्दी दिसणे आवश्यक असल्याने उमेदवारांचे रोजंदारीवर आणलेले मजूर प्रचारक पळविण्याचे प्रकार कल्याण-डोंबिवलीत सुरू झाले आहेत. प्रचारक मजुर पुरविणारे कथित कामगार नेते सकाळीच झोपडपट्ट्या आणि चाळींमध्ये जाऊन मजुरांनी आपल्या सोबत प्रचाराला यावे यासाठी गळ घालत असतात. प्रचारासाठी प्रचारक मजुरांची गरज वाढू लागली आहे. त्यात प्रचारक मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. उमेदवारांनी मजुरांना आता 1000 रूपये ते 1500 रूपये रोजंदारी देण्याची तयारी दर्शवली आहे. पुरूष प्रचारकांना त्यांचा मेहनतनामा आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे रात्री श्रमपरिहाराची व्यवस्था करून द्यावी लागते.
गेल्या 20 - 25 दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराला अवघे 24 तास उरले आहेत. येत्या 24 तासांत प्रचारात जो आघाडी घेईल तोच उमेदवार निवडून येईल, असे भाकीत (?) वर्तविणारे मजूर देखिल आपापले भाव वाढवून सांगू लागले आहेत. पुरूष मजूर प्रत्येकी 2000 हजार रूपये, तर महिला मजूर 1500 रूपये मागणी करत आहेत. उमेदवार देखिल मजुरांना त्यांची रोजंदारी देण्यास राजीखुशीने तयारी दर्शवत आहेत. परिणामी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रचारक मजुरांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येते.