ड्रेनेजचे काम अर्धवट सोडून ठेकेदार पसार; धायरीतील नागरिकांचा आरोपPudhari
Published on
:
01 Feb 2025, 6:41 am
Updated on
:
01 Feb 2025, 6:41 am
खडकवासला: धायरी येथील मुख्य रस्त्यावरील गणेशनगर, आबासाहेबनगर ते धायरी फाट्यापर्यंत मंजूर असलेले ड्रेनेज लाईनचे काम अर्धवट सोडून ठेकेदार पसार झाल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. या कामासाठी महापालिकेने पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
अर्धवट कामामुळे मैलापाणी घरादारात शिरणार असून नांदेड किरकटवाडीसारखी साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. मलनिस्सारण विभागाने मात्र ठेकेदाराने काम अर्धवट सोडले नसून, पाच कोटी रुपयांचा निधी केवळ धायरीसाठी मंजूर नव्हता. या निधीतून प्रभाग क्रमांक 33 मध्ये ड्रेनेज लाईनची काम सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. माजी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे यांनी या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
रहिवाशी समीर रायकर म्हणाले की, अर्धवट कामामुळे मैलापाणी घरादारात शिरणार आहे. त्यामुळे रोगराई,आरोग्यांची समस्या उद्भवणार आहे. नांदेड किरकटवाडीसारखी साथीच्या रोगाची गंभीर स्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने अर्धवट काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे.
धायरी येथील मुख्य रस्त्यावरील तसेच आसपासच्या लोकवस्त्या, सोसायट्यांतील बहुतेक ड्रेनेज लाईन कमी व्यासाच्या आहेत. चेंबर तुबुंन मैलापाणी रहिवाशांच्या घरासह मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गणेशनगर भागातच ड्रेनेज लाईनचे काम केले आहे. त्यामुळे पावसाळ्यात ड्रेनेज तुंबून मैलापाण्याची समस्या गंभीर होणार आहे. त्यामुळे हजारो नागरिकांना गैरसोय सहन करावी लागणार आहे.
-राजाभाऊ लायगुडे, माजी नगरसेवक
धायरी, वडगाव प्रभागासाठी पाच कोटींचा निधी मिळाला आहे. धायरी येथे मैलापाण्याची गंभीर समस्या असलेल्या भागात नवीन ड्रेनेज लाईन बसविण्यात आल्या आहेत. उर्वरित निधीतुन सनसनाटी ते प्रायजासिटीपर्यंत ड्रेनेज लाईनचे काम सुरू आहे. पुढील अर्थसंकल्पात निधी उपलब्ध झाल्यास धायरी येथील उर्वरित काम करण्यात येणार आहे.
-निष्णांत छापेकर, कनिष्ठ अभियंता, मलनिस्सारण विभाग, महापालिका