सुट्या पैशांवरुन वाहक-प्रवाशांमध्ये बाचाबाचीFile Photo
Published on
:
01 Feb 2025, 8:53 am
Updated on
:
01 Feb 2025, 8:53 am
जळोची: एसटीच्या नव्या भाडेवाढीमुळे प्रवासी आणि वाहक यांच्यात सुट्या पैशांवरून दररोज बाचाबाची होत असून, अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर आगारातील नांदेड बुद्रुक या मार्गावर कामगिरी बजाविणार्या वाहकाला मारहाण झाल्याचा गुन्हा पोलिसांत दाखल करण्यात आला आहे.
भाडेवाढ झाल्यानंतर पाच दिवसांत अनेक ठिकाणी बाचाबाची झाल्याच्या घटना सोशल मीडियावर फिरत असून, यातून पुढे काही अनर्थ घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून भाडेवाढ सूत्रात तत्काळ बदल होण्यासाठी एसटीकडून पुन्हा एकदा राज्य परिवहन प्राधिकरणाकडे फेरप्रस्ताव सादर करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी करत आहेत.
नवीन भाडेवाढ ही पाच रुपयांच्या पटीत असावी, असा स्पष्ट प्रस्ताव एसटीने यापूर्वीच पाठवला असताना त्याला प्राधिकरणातील अधिकार्यांनी केराची टोपली दाखवली. आर्थिक नुकसान होण्याचे तकलादू कारण देत अनपेक्षितपणे बदल करून एक रुपयाच्या पटीत भाडेवाढ करण्याचा आदेश काढला. सध्या चलनात सुट्या पैशांचे व्यवहार जवळ जवळ बंद झाले आहेत.
एटीएममधूनसुद्धा शंभर, दोनशे व पाचशे रुपयांच्या नोटा निघत असल्याने कोणताही प्रवासी सुटे पैसे मागितल्यावर देत नाही. तरीही भाडेवाढ करताना प्राधिकरणाकडून एक रुपयाच्या पटीत भाडेवाढ केली गेली व एसटीला तोटा होण्याची भीती दाखवून अनपेक्षितपणे प्राधिकरणाकडून हा निर्णय लादला गेल्याची प्रतिक्रिया एसटी कर्मचारी व्यक्त करत आहेत.
तक्रारी, गुन्ह्यांचे पुरावे सादर करा16 जून 2018 व 26 ऑक्टोबर 2021 रोजी भाडेवाढ पाच रुपये पटीत करण्यात आली होती. त्याच सूत्रानुसार भाडेवाढ पाचपटीत करण्यासाठी प्राधिकरणातील अधिकार्यांना सांगायला हवे. सुट्या पैशांची अडचण येत असल्याचे पुरावे देऊन त्याचप्रमाणे वाहकांकडून आलेल्या तक्रारी व पोलिसांत दाखल झालेले गुन्हे, याचे पुरावे सादर करून पुन्हा एकदा प्रस्ताव एसटीकडून पाठविण्याची मागणी एसटी कर्मचारी करत आहेत.