परभणी/गंगाखेड (Parbhani) :- तालुक्यातुन वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्रातून होत असलेला अवैध वाळू (Illegal sand) उपसा रोखण्यासाठी तहसीलदार उषाकिरण श्रुंगारे यांनी मोहीम हाती घेतली असुन शुक्रवार ३१ जानेवारी रोजी सायंकाळी मसला शिवारात केलेल्या कारवाईत त्यांनी अवैध वाळू साठ्यांसह काही साहित्य जप्त केले आहे.
मसला शिवारातून अवैध वाळू साठे व साहित्य जप्त
गंगाखेड तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्रातील वाळूचा चोरून उपसा करण्यासाठी गोदावरी नदी काठच्या गावा गावातील वाळू माफियांत एक प्रकारची स्पर्धा सुरु झाल्याने गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या होत असलेला अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी तहसीलदार उषाकिरण श्रुंगारे यांनी मोहीम हाती घेत गेल्या काही दिवसांत तराफे नष्ट करण्याची कारवाई केली.
शुक्रवार ३१ जानेवारी रोजी मसला शिवारात गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच तहसीलदार उषाकिरण श्रुंगारे, नायब तहसीलदार अशोक केंद्रे, मंडळ अधिकारी चंद्रकांत साळवे, तलाठी संतोष ईप्पर, शिपाई अर्जुन आघाव, कोतवाल गोविंद मैड आदींच्या पथकाने सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मसला गोदावरी नदी पात्रात जाऊन वाळू उपसा करण्यासाठी असलेले खोरे, टोपले आदी साहित्य ताब्यात घेऊन गोदावरी नदी काठावर तसेच मसला गावातील रस्त्यावर जागोजागी पाच ठिकाणी असलेले अंदाजे ५० ते ६० ब्रास वाळूचे अवैध साठे जप्त करण्याची कारवाई करून या साठ्याबद्दल ग्रामस्थांकडे विचारणा केली मात्र सदर वाळू साठे कोणी केले याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली नाही.