राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माढ्यातील नेते संजय कोकाटे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. Pudhari Photo
Published on
:
01 Feb 2025, 1:59 pm
Updated on
:
01 Feb 2025, 1:59 pm
टेंभुर्णी: पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माढ्यातील नेते संजय कोकाटे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुंबईतील वरळी येथील एमएमआरडीए च्या विश्रामगृहात दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. येत्या १५ दिवसांत ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते. दरम्यान, तुळजापूर-शिखर शिंगणापूर कावडयात्रा मार्ग, मतदारसंघातील प्रलंबित विाकास कामे मार्गी लावण्या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. (Sanjay Kokate meets Eknath Shinde)
कोकाटे माढा मतदारसंघातून विधानसभा लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून आग्रही होते. मात्र, निवडणुकीच्या साठमारीत त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही. त्यांच्या ऐवजी अभिजीत पाटील यांना उमेदवारी मिळाली आणि ते निवडून आले. यामुळे कोकाटे हे काय भूमिका घेतात? याकडे मतदारसंघातील सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. ते राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.
ते प्रामुख्याने अकलूजच्या मोहिते-पाटील यांच्या भूमिकेवर नाराज आहेत. मोहिते पाटील कुटुंबाने माढा विधानसभेसाठी पुढे केलेल्या शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाला कोकाटे यांचा विरोध होता. अभिजीत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही अनेक दिवस कोकाटे निवडणुकीपासून लांब होते. नवीन पदाधिकारी, नूतन आमदार व खासदार यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात त्यांना दूर ठेवले होते. निवडणुकीनंतरही कोकाटे यांची पक्षात घुसमट होत असल्याच्या चर्चा होत होत्या.
कोकाटे यांनी २०१९ मध्ये झालेली माढा विधानसभेची निवडणूक शिवसेना पक्षाकडून लढविली होती.या निवडणुकीत त्यांना ७५ हजार मते मिळविली होती.तेव्हापासून संजय कोकाटे यांचे नाव माढा मतदार संघात सतत चर्चेत राहिले होते.
१५ वर्षाच्या वनवासातून मोहिते-पाटील काहीच शिकले नाहीत. निवडून आले की, पुन्हा ते गटबाजीचे राजकारण करीत आहेत, असे सांगून कोकाटे यांनी तालुक्यत आता हस्तक्षेप करू देणार नाही, असा इशारा दिला.