कारखान्यातील तेलाच्या टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला.
Published on
:
01 Feb 2025, 4:42 pm
Updated on
:
01 Feb 2025, 4:42 pm
धुळे : धुळे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीच्या टाकीवर वेल्डिंगचे काम करत असताना गॅसचा स्फोट झाल्याने टाकीवरून पडून एक जणांचा मृत्यू झाला तर आणखी एक कामगार गंभीर जखमी आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केली आहे. उपेंद्र राजभर (वय २५) असे अपघातील मृताचे नाव आहे.
औद्योगिक वसाहतीमधील संजय सोया कारखान्यात एका तेलाच्या टाकीवर वेल्डिंग करण्याचे काम सुरू होते. सायंकाळी उशिरा हे काम सुरू असताना अचानक टाकीमध्ये तयार झालेल्या गॅसचा स्फोट झाला. त्यामुळे टाकीवरून काम करणारे कामगार खाली पडले. यामध्ये उपेंद्र राजभर हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर संदीप राजभर हा गंभीर जखमी झाला असून त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये धनंजय राजभर हा देखील किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे व मोहाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील हे पथकासह घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी या घटनेची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान काही प्रत्यक्षदर्शी कामगारांनी कंपनीच्या व्यवस्थापनावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. या टाकीमधील गॅसमुळे अपघात होऊ शकतो, त्यामुळे सायंकाळी उशिरा टाकीवर काम करू नये, असे सुचवले असताना काही जणांनी काम सुरू ठेवले. यानंतर हा अपघात झाल्याची माहिती कामगारांनी दिली आहे.