नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा-
येत्या दोन ते तीन वर्षांत देशात २०० नवीन वंदे भारत गाड्या, १०० अमृत भारत गाड्या, ५० नमो भारत रॅपिड रेल आणि १७,५०० सामान्य नॉन एसी कोच येतील अशी अपेक्षा असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी रेल्वे मंत्रालयाला सलग दुसऱ्यांदा २,५२,००० कोटी रुपयांची मोठी रक्कम अर्थसंकल्पीय मदत म्हणून देण्यात आली. नवीन गाड्या आणि आधुनिक कोच मध्यमवर्गीय लोकांच्या सेवेत खूप मदत करतील, असे म्हणत रेल्वेमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्र्यांचे आभार मानले.
अश्विनी वैष्णव म्हणाले की, केंद्रीय अर्थसंकल्प हा विकसित भारतसाठी एक रोडमॅप आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या ४ लाख ६० हजार कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांचा उल्लेख आहे. सुरक्षेवर लक्ष केंद्रित करून, विविध प्रकल्पांद्वारे भारतीय रेल्वेची सुरक्षितता वाढविण्यासाठी या वर्षी १ लाख १६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या आर्थिक वर्षात राष्ट्रीय प्रकल्पांसाठी बाजारातील कर्जाच्या कर्जफेडीसाठी ७०६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासह भारतीय रेल्वेचा निव्वळ महसूल खर्च या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अंदाजात ३,०२,१०० कोटी रुपये आहे, हा खर्च गेल्या आर्थिक वर्षाच्या सुधारित अंदाजात २,७९,००० कोटी रुपये होता.
अश्विनी वैष्णव म्हणाले की, भारतीय रेल्वे या आर्थिक वर्षाच्या अखेरीस १.६ अब्ज टन मालवाहतूक करणारी दुसरी सर्वाधिक मालवाहतूक करणारी रेल्वे बनण्यास सज्ज आहे. हाय स्पीड ट्रेन्सबद्दल ते म्हणाले की, २०४७ पर्यंत २५० किमी प्रति तास वेगाने ७००० किमी हाय स्पीड रेल्वे नेटवर्क बनवण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. भारतीय रेल्वे २०२५-२६ आर्थिक वर्षाच्या अखेरीस १०० टक्के विद्युतीकरण साध्य करेल.