चोळेगाव-ठाकुर्लीतील विसर्जन तलाव देखभाल-दुरूस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आला आहे.Pudhari Photo
Published on
:
01 Feb 2025, 5:19 pm
Updated on
:
01 Feb 2025, 5:19 pm
डोंबिवली : देखभाल आणि दुरूस्तीचे काम करण्यासाठी ठाकुर्ली चोळे गावातील तलाव गणपती विसर्जनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. माघी गणेशोत्सव सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ऐन माघी गणेशोत्सवात गणेशभक्तांची परवड होणार आहे. परिणामी गणेश भक्तांसह राजकीय मंडळींकडून प्रशासनाच्या या निर्णयावर टीका केली जात आहे.
डोंबिवली, ठाकुर्ली, 90 फुटी रोड, सारस्वत कॉलनी, पेंडसेनगर आणि आसपासच्या परिसरातील बहुतांशी भाविक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि इतर उत्सव काळात मूर्तींच्या विसर्जनासाठी ठाकुर्ली चोळेगावातील तलावावर येतात. हा तलाव केडीएमसीने यापूर्वीच सुशोभित केला आहे. विसर्जनासाठी हे ठिकाण सुरक्षित असल्याने बहुतांशी भाविक चोळे गावच्या तलावाला प्राधान्य देत असतात. माघी गणेशोत्सव शनिवारपासून सुरू झाला. भाविक दीड आणि पाच दिवस गणपतीचे पूजन करून मग गणपतीचे विसर्जन करतात. केडीएमसीने गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला हा तलाव गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर करून भाविकांची गैरसोय केल्याची टीका गणेशभक्तांकडून करण्यात येत आहे. चोळेगावचा हा तलाव विसर्जनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याने या भागातील गणेशभक्तांना कचोरे येथे रेल्वे मार्ग ओलांडून खाडी किनारी, एमआयडीसीतील मिलापनगर तलाव किंवा पश्चिम डोंबिवलीतील गणेशनगर, मोठागाव भागातील खाडी किनारच्या विसर्जन घाटावर जावे लागणार आहे.
कर्तव्यदक्ष आयुक्त, दोन अतिरिक्त आयुक्तांसह उपायुक्तांची मोठी फौज प्रशासनात लोकसेवेसाठी तत्पर असताना एकाही अधिकाऱ्याला आपण चोळेगाव तलाव दुरूस्तीचे काम माघी गणेशोत्सवात हाती घेऊन भक्तांची गैरसोय करत आहोत, असे वाटले नाही. विशेष म्हणजे याठिकाणी कृत्रिम तलावांची सुविधा निर्माण करण्याचे कुणा अधिकाऱ्याला सुचले नाही. राज्य सरकार आणि प्रशासनाने गणेश भक्तांची मोठी परवड केली आहे. हा बेजबाबदारपणा नव्हे तर श्रध्देवरील अन्यायाची परिसिमा असल्याची टीका ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.