राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवान गडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. यावेळी नामदेव शास्त्री यांनी मुंडे यांच्या पाठिशी असल्याचं विधान केलं. तसेच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांची मानसिकता का बिघडली हे मीडियाने का नाही दाखवली?, असा धक्कादायक सवाल नामदेव शास्त्री यांनी केला. त्यामुळे नामदेव शास्त्री यांच्यावर टीका होत आहे. तर दुसरीकडे आज मस्साजोगमध्ये गावकऱ्यांची एक बैठक पार पडली. यात नामदेव शास्त्री यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्या सकाळीच मस्साजोगमधून तीन चार गाड्या भगवान गडाकडे निघणार आहेत. यावेळी गावकरी नामदेव शास्त्री यांची भेट घेणार आहेत.
महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याने आज मस्साजोग येथे गावकऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी भगवान गडावर जाऊन नामदेव शास्त्री यांची भेट घेण्याचा आणि त्यांना वस्तुस्थिती सांगण्याचा निर्णय घेण्यात आहे. याबाबतची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे. उद्या तीन चार गाड्या घेऊन आम्ही भगवान गडावर जाणार आहोत. सकाळी 9 नाजता मस्साजोगमधून निघू. दुपारी 12.30 वाजेपर्यंत भगवान गडावर आम्ही पोहोचू, असं धनंजय देशमुख यांनी सांगितलं.
आरोपींनी क्रूरपणे हत्या केलीय
राज्यातील विविध संप्रदायातील महंत मंडळी आम्हाला भेटून गेले. आम्ही त्यांच्याकडून प्रेरणा घेतली. आरोपींवर अनेक गुन्हे आहेत. त्यांचा हा पहिलाच गुन्हा नाही. या आरोपींनी क्रूरपणे हत्या केली आहे. हे सांगण्यासाठीच आम्हाला नामदेव शास्त्रींकडे जावं लागत आहे. आमची काहीही मागणी नाही. आमचं दु:ख व्यक्त करण्यासाठी आम्ही तिथे जात आहोत. दुसरं काही नाही, असं धनंजय देशमुख म्हणाले.
मीडियातूनच निरोप गेलाय
आम्ही श्रद्धास्थान आदरणीय भगवान बाबांचे दर्शन घेऊ. त्यानंतर आम्ही आमची व्यथा मांडून परत येणार आहोत. आमचा दुसरा कोणताही उद्देश असणार नाही. आम्ही येतोय हा निरोप त्यांना मीडियाच्या माध्यमातूनच कळला आहे. त्यांनीही ते थांबणार असल्याचं सांगितलं आहे. आमच्यावर दुःखाचा डोगर कोसळला आहे, हे त्यांना दाखवायचं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
अपेक्षित उत्तर घेणार
शिष्टमंडळ आणि गावकरी आम्ही सगळे भगवानगडावर जाणार आहोत. 28 मे पासून आतापर्यंत काय काय घडलं? खंडणी कशाप्रकारे मागितली, खून कसा झाला, संतोष देशमुख यांच्यावर कुठले गुन्हे आहेत का हे पण आम्ही त्यांना दाखवणार आहोत आणि आम्ही त्यांच्याकडून अपेक्षित उत्तर घेणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.