Published on
:
01 Feb 2025, 5:13 pm
Updated on
:
01 Feb 2025, 5:13 pm
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगपालिकेच्या बाजार आणि परवाना विभागातील लिपिक प्रकाश काशिनाथ धिवर याला ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी दीड लाख रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या संदर्भात लाच विरोधी पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या लिपीकाचे वरिष्ठ अधिकारी देखील समाविष्ट असल्याने केडीएमसीचा बाजार परवाना विभाग लाचखोरीच्या गर्तेत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर लाच विरोधी पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. लिपिक धिवर याने ही रक्कम स्वतःसह आणखी कुणासाठी उकळण्याचा प्रयत्न केला ? याचीही सखोल चौकशी करण्यात येत आहे.
या संदर्भात स्थानिक बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार हे केडीएमसी हद्दीत मटण विक्रीचा व्यवसाय करतात. या व्यवसायाचा परवाना अर्ज स्वीकृत करण्यासह परवाना हस्तांतरित करण्यासाठी मदत म्हणून बाजार व परवाना विभागातील लिपिक प्रकाश धिवर याने तक्रारदाराकडे स्वत:सह वरिष्ठांसाठी दोन लाख रूपये लाचेची मागणी केली होती. एवढी रक्कम देणे तक्रारदारास शक्य नसल्यामुळे तडजोडी अंती ही रक्कम 1 लाख 50 हजार स्वीकारण्याचे लिपिक धिवर याने मान्य केले. परवाना अधिकृत असताना बाजार व परवाना विभागातील कर्मचारी आपल्याकडे मोठी रक्कम मागत असल्याने तक्रारदाराने ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत लिपिक धिवर हा लाच मागत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी केडीएमसी मुख्यालयात सापळा लावला होता.
...आणि लिपीकाने उघडले तोंड
तक्रारदाराकडून दीड लाख रूपये घेताना लिपिक प्रशांत धिवर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. लाचखोरीत अडकलेल्या प्रशांत धिवर याने प्राथमिक चौकशी दरम्यान तोंड उघडले. त्याने या प्रकरणात वरिष्ठांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे लाच विरोधी पोलिसांनी या प्रकरणाचा चौकस तपास सुरू केला आहे. लिपीक धिवर हा प्यादा आहे. मात्र यामागे बडे अधिकारी देखील असल्याचे धिवरच्या चौकशीतून अधोरेखित झाले आहे.
अधिकाऱ्यांना कोणत्याही क्षणी अटक
धिवरच्या चौकशीनंतर लाचेच्या रक्कमेत वाटा मागणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. हे अधिकारी कोण आहेत ? त्यांनी आतापर्यंत लिपिक प्रशांत धिवर याचा वापर करून किती व्यवसायिकांकडून रक्कमा उकळल्या आहेत ? हे लवकरच चव्हाट्यावर येणार आहे. या संदर्भात पोलिस अधीक्षक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष अंबिके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास चक्रांना वेग दिला आहे.