महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यंदाच्या निवडणुकीत महायुतीत सुरुवातीला आधी जागावाटपावरुन वाद झाला. त्यानंतर निवडणुका पार पडल्यानंतर खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार यावरुन तिढा निर्माण झाला. यानंतर आता सध्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीत वाद सुरु आहे. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाच्या एका आमदाराने मोठे वक्तव्य केले. विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधात भाजपाच्या लोकांनी पैसे वाटले, असा गंभीर आरोप शिंदे गटाच्या आमदाराने केला आहे.
नुकतंच नांदेडमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना शिंदे गटाचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर यांनी भाजपामध्ये नवीन आलेल्या लोकांनी माझे काम केले नाही. माझ्याविरोधात भाजपाच्या लोकांनी पैसे वाटले, असा आरोप केला. त्यांच्या या आरोपामुळे खळबळ उडाली आहे.
“…त्यामुळे माझा निसटता विजय झाला”
“विधानसभा निवडणुकीत महायुतीत काय त्रास झाला हे सगळ्यांना माहीत आहे. भाजपामध्ये नवीन आलेल्या लोकांनी माझे काम केले नाही. माझ्याविरोधात भाजपाच्या लोकांनी पैसे वाटले. मला 50 हजारांची लीड मिळणे अपेक्षित असताना केवळ साडेतीन हजारांची लीड मिळाली. त्यामुळे माझा निसटता विजय झाला”, अशी खदखद बालाजी कल्याणकर यांनी व्यक्त केली.
“चांगलं काम केल्याने मी निवडून आलो”
“माझं मतदारसंघात मी चांगलं काम केल्याने जनतेच्या आशीर्वादाने मी निवडून आलो. महायुती म्हणून भाजपाने सहकार्य करणे आवश्यक होते. परंतु तसे विधानसभा निवडणुकीत झाले नाही”, असेही बालाजी कल्याणकर यांनी सांगितले.
“नांदेड उत्तरच्या जनतेचे मला आशीर्वाद”
दरम्यान नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला. यानंतर एका सत्कार सभारंभावेळी बोलताना कल्याणकर यांनी मंत्रिपदाबाबतची इच्छा बोलून दाखवली होती. “नांदेड उत्तरच्या जनतेने मला आशीर्वाद दिले, त्याबद्दल मी आभार मानतो. 50 वर्षात झाला नाही. तेवढा विकास नांदेड उत्तर मतदारसंघात शिंदेसाहेबांमुळे झाला आहे. जेव्हा शिंदे साहेबांनी उठाव केला, तेव्हा आम्ही शिंदे साहेबांच्या पाठीशी होतो. साहेबांनी जो मला शब्द दिला तो साहेब पूर्ण करतील हे मी 100% सांगतो, असं कल्याणकर म्हणाले होते. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांची भावना आहे आमदार बालाजी कल्याणकर मंत्री झाले पाहिजेत”, असेही विधान केले होते.