रणजी फी स्पर्धेत शेवटच्या फेरीचे सामने सुरु आहेत. या फेरीतल्या अनेक सामन्यांचे निकाल लागले आहेत. तर काही सामने शेवटच्या टप्प्यात आहेत. असं असताना जम्मू काश्मीर आणि बडोदा संघात खेळपट्टीवरून राडा झाला. खेळपट्टीसोबत छेडछाड केल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. जम्मू काश्मीर संघाने यजमान बडोदा संघावर हा गंभीर आरोप केला आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच 1 फेब्रुवारीला जम्मू काश्मीर संघाने कृणाल पांड्याच्या संघावर पिच टॅम्परिंगचा आरोप केला. जम्मू काश्मीर संघाने दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीच्या रात्री खेळपट्टीमध्ये बदल केल्याचा आरोप केला. पण बडोदा संघाने हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. तसेच यात काहीच तथ्य नसल्याचं सांगितलं आहे. बीसीसीआयने या वादावर स्पष्टीकरण दिले असून खेळपट्टीचा रंग बदलण्याचे कारण खेळपट्टीतील आर्द्रता असल्याचे म्हटले आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, सकाळी विरोध प्रदर्शन झाल्याने सामना सुरु होण्यास दिरंगाई झाली. सामना 9.30 वाजता सुरु होणार होता. पण सामना 10 वाजून 55 मिनिटांनी सुरू झाला.
बडोदा क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ‘जम्मू काश्मीरच्या कोचने केलेले आरोप निराधार आहेत. आउटफिल्ड ओलं होतं आणि थंडीमुळे खेळपट्टीवर ओलावा होता. इतकंच काय तर आउटफिल्डही ओली होती. पंचांना असंच वाटलं. ज्यांनी क्रिकेट खेळलं आहे त्याला तसंच वाटू शकते. थंडीत खेळपट्टीवर ओलावा असतो. यासाठी खेळपट्टी सुकण्यास वेळ लागतो. अनेकदा सामना सुरु होण्यास वेळही लागतो. पण असे आरोप करणं चुकीचं आहे. आम्ही असे आरोप सहन करणार नाही आणि बीसीसीआयकडे तक्रार करणार आहोत.’
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना जम्मू-काश्मीरने पहिल्या डावात 246 धावा केल्या. बडोदा संघ 166 धावांत आटोपला. त्यानंतर जम्मू काश्मीरने 284 धावा केल्या आणि विजयासाठी 365 धावांचं आव्हान दिलं आहे. बडोद्याने 2 विकेट गमवून 58 धावा केल्या आहेत. अजूनही 307 धावांची गरज आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण आहे. गेल्या सामन्यात मुंबईसारख्या बलाढ्य संघाला पराभूत केल्यानंतर उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी जम्मू-काश्मीरला एक ड्रॉ पुरेसा आहे. पण पुढील फेरीसाठी पात्र ठरायचे असेल तर बडोद्याला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकणे आवश्यक आहे.