वर्धाः भारत हा कृषिप्रधान देश असून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची मोठी जबाबदारी कृषी विभागावर आहे. त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावा, असे आवाहन राज्याचे गृह (ग्रामीण), शालेय शिक्षण, सहकार, गृहनिर्माण, खनिकर्म विभागाचे राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
जिल्हा क्रीडा संकुल वर्धा येथे आयोजित जिल्हास्तरीय कृषी विभागाच्या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्मा संचालक डॉ. नलिनी भोयर यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व कृषी विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर पुढे म्हणाले की, संपूर्ण वर्षभर नागरिकांचे प्रश्न निघाली काढताना आपल्या स्वतः साठी सुद्धा वेळ मिळावा. यासाठी शासनाच्या वतीने विविध विभागाच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सहकारी अधिकारी, कर्मचारी यांच्या भेटीगाठी होतात. या भेटीदरम्यान कामकाजाबाबत चर्चा करून सर्वसामान्यांचे अधिकाधिक प्रश्न कसे निकाली काढता येईल यासाठी प्रयत्न करा. आत्महत्याग्रस्त जिल्हा हा डाग आपल्या सर्वांच्या सहकार्याने पुसून काढायचा आहे, असे ते म्हणाले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार म्हणाले, 100 पेक्षा अधिक योजना राबविण्याची जबाबदारी कृषी विभागावर आहे. त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला कामाच्या स्वरूपात न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून क्रीडा स्पर्धेचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. यावेळी कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी विविध पोशाख परिधान करून राज्याच्या संस्कृतीचे प्रदर्शन पथसंचलनाच्या माध्यमातून दाखविले. कार्यक्रमाचे संचालन आत्मा कार्यालयाचे पंकज सावरकर व मोईन शेख यांनी केले तर उपस्थितांचे आभार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तोटावार यांनी मानले.