केज :- केज तालुक्यात एका व्यापाऱ्याचे शेतमालाच्या गोडाऊनच्या मागील बाजूचा पत्रा उचकटून आतील राजमा या शेत मालाचे १६५ कट्टे आणि गल्ल्यातील ७५ हजार रु. असा एकूण ८ लाख १७ हजार ५०० रू. ची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे.
केज तालुक्यातील मस्साजोग येथील गणेश दिगंबर गायकवाड यांचे धनलक्ष्मी ट्रेडर्स नावाचे शेतीमालाचे दूकान आहे. गणेश गायकवाड हे तूर, सोयाबीन व राजमा हे माल खरेदी करतात. ३१ जानेवारी रोजी त्यांनी दिवसभर शेती मालाचे खरेदी करुन रात्री ९:३० वाजता दुकान बंद करुन घरी गेले. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ६:०० वा. चे सुमारास ते शेतात जात असताना त्यांनी दुकानाकडे चक्कर मारली. त्यावेळी गोडाऊनचे पश्चिम बाजूचे मागच्या बाजूचा पत्रा उचकटून काढलेला दिसला. म्हणून त्यांनी जवळ जावून पाहीले असता दुकानातील राजमा भरलेले पोत्याची थप्पी कमी झालेली दिसली आणि गोडावूनचे लगत असलेल्या शेतातून वाट केलेली दिसली.
राजमाचे कट्टे मोजून पाहीले असता २५० कट्टया पैकी १६५ कट्टे व दुकानातील गल्ल्यातील नगदी ७५ हजार रु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले असल्याचे आढळून आले. चोरीला गेलेल्या राजमाची किंमत ही ७ लाख ४२ हजार ५०० रू. आणि नगदी ७५ हजार असा एकूण ८ लाख १७ हजार ५०० रू. ची चोरी झाली आहे. गणेश गायकवाड यांनी केज पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश बनसोडे हे तपास करीत आहेत.