अपर मुख्य सचिव श्री. रेड्डी यांनी मॉडेल महाविद्यालयाच्या इमारतीची पाहणी केली.Pudhari Photo
Published on
:
01 Feb 2025, 1:57 pm
Updated on
:
01 Feb 2025, 1:57 pm
नंदुरबार : येथील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या मॉडेल महाविद्यालयीन इमारतीचा लवकरच वापर सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उभारण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव तथा नंदुरबारचे पालक सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
नंदुरबार शहरालगतच्या जिल्हा कारागृहाजवळ सुमारे 20 कोटी रुपये खर्चून उभारल्या जाणाऱ्या या महाविद्यालयाच्या इमारतीची पाहणी अपर मुख्य सचिव श्री. रेड्डी यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ.विजय एल. माहेश्वरी, रजिस्टार डॉ. विनोद पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सह संचालक कपिल सिंघल, विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, कार्यकारी अभियंता (सा.बा.नंदुरबार) अंकुश पालवे, कनिष्ठ अभियंता आनंद गोसावी, कनिष्ठ अभियंता सुनिल नेमाडे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी गणेश वळवी हे उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालय परिसरातील अंतर्गत रस्ते, मुख्य रस्ता, वृक्षलागवड तसेच वसतीगृहासह अन्य सुविधांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे यांनी पुढाकार घेऊन आवश्यक त्या सुविधांचा आराखडा तयार करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांसाठी सुविधा विकसित करण्यावर भर देण्याबरोबरच महाविद्यालयाचा वापर सुरू होण्यापूर्वी मुख्य रस्त्यांशी जोडणी, वसतीगृह सुविधा, तसेच इमारतीतील आवश्यक सुधारणांसाठी उपाययोजना हाती घेण्याच्या सूचनाही श्री. रेड्डी यांनी प्रशासनाला दिल्या. या भव्य वास्तूचा लवकरात लवकर उपयोग सुरू करून विद्यार्थ्यांना अधिकाधिक शैक्षणिक व भौतिक सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या पाहणी दौऱ्यात संबंधित विभागांचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि विद्यापीठ प्रशासनातील पदाधिकारी तसेच कंत्राटदार उपस्थित होते.