सोलापुरात चोरांच्या एका टोळीला जेरबंद केल्यानंतर पोलीसच चक्रावून गेले आहेत. कारण टीव्हीवरील क्राइम शो पाहून या चोरांनी अनेक गुन्हे केले होते. चोरी करताना पोलिसांच्या हाती पुरावा देखील लागत नव्हता. अखेर पोलिसांनी या टोळीला जेरबंद करण्यात यश मिळवलं. पण त्यांच्या गुन्ह्याची पद्धत पाहून पोलिसांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तीन चोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या चोरानी क्राइम शोच्या माध्यमातून पोलिसांपासून कसं वाचायचं ते शिकले होते. पण सोलापूर पोलिसांनी तिन्ही चोरांच्या मुसक्या आवळल्या. तिन्ही चोर हे राजस्थानचे राहणारे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून कारसह 9 लाख 44 हजार 202 रुपयांचं सामान जप्त केलं आहे. या तिघांना पकडल्यानंतर सहा गुन्ह्यांची उकल झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘माणकचंद (35), भुंडाराम (38) आणि गणपत (41) या तिघांवर कर्जाचं ओझं होतं. यासाठी या तिघांनी चोरीचा मार्ग पत्कारला होता. यासाठी या तिघांना चोरीसाठी वेगवेगळी ठिकाणं निवडली. या तिघांनी हैदराबादला जाऊन तीन मोठ्या चोऱ्या केल्या होत्या. हैदराबाद पोलिसांनी या तिघांच्या मुसक्या आवळल्या आणि कोर्टात सादर केलं. तिथे या तिघांना जामीन मिळाला आणि बाहेर आले.’
पहिल्याच चोरीत अपयश आल्याने या तिघांनी मास्टरप्लान आखला. त्यांनी क्राइम शो पाहण्याचा धडाका सुरु केला. यात त्यांनी पोलिसांना चकवा कसा देता येईल याबाबत समजून घेतलं. त्यानुसार चोरांनी चोरीचा प्लान आखण्यास सुरुवात केली. क्राइम शोमधील आयडिया डोक्यात ठेवून हे तिघंही मोबाईल वापरत नव्हते. त्यामुळे चोरीच्या ठिकाणी कोण होतं हे शोधणंही पोलिसांना कठीण जात होतं. शहरात प्रवेश करताना टोल नाक्यावरही पोलिसांच्या हातावर तुरी द्यायचे. गूगल मॅपच्या माध्यमातून मोठ्या बाजारांची रेकी करायचे आणि जवळच्या लॉजवर राहायचे. दिवसा दुकानांची रेकी करत आणि रात्री शटर तोडून चोरी करायचे. या चोरांनी सोलापूर, चंद्रपूर, लातूर आणि सांगलीत चोऱ्या केल्या आहेत. 17 जानेवारीला त्यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन दुकानात चोरी केली. त्यानंतर पोलिसांनी या चोरांना पकडण्यासाठी सूत्र हलवली.
सोलापूरच्या कर्णिक नगरजवळ तिघंही विना नंबर प्लेटच्या कारसह उभे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आपलं जाळं रचलं आणि तिघांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर या चोरांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच पोलिसांना कसा चकवा द्यायचे तेही सांगितलं.