शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे, असं विधान केलं आहे. त्यामुळे दोन्ही शिवसेना एकत्र येणार का? एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंशी हातमिळवणी करणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यावर आता ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोठं विधान केलं आहे. शिरसाट यांनी पक्षातून जाण्याआधीच हा विचार का केला नाही? असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
चंद्रकांत खैरे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांना भाजपने वेगळं पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्या भीतीपोटीच संजय शिरसाट यांनी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत अशी गुगली टाकली आहे. दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असं शिरसाट म्हणत असतील तर त्यांनी हा विचार आधीच का केला नाही? असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते
पक्षातून फुटण्याआधी उद्धव ठाकरे यांच्याशी मनमोकळेपणाने बोलले असते तर त्यांनी ऐकलं असतं. उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करायचे होते. पण परिस्थिती वेगळी झाल्यामुळे शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नाही. मात्र भविष्यात एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते, असा दावाही खैरे यांनी केला.
आधी बॉसशी बोलावं
आता भाजप यांना वेगळे करण्याची भीती आहे म्हणून ते या सर्व गोष्टी बोलत असतील. शिरसाट यांनी त्यांचे बॉस एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकदा बोलावं आणि त्यांनी ठरवल्यावर मग उद्धव ठाकरे यांच्याकडे यावं. ते ठरवतील काय करायचं, असा टोलाही त्यांनी लगावला.
बजेट खराबही नाही, चांगलाही नाही
मला भाजपाकडून राज्यपालपदाची तर शिवसेनेकडून खासदारकीची ऑफर होती, असा पुनरुच्चारही त्यांनी केला. तसेच केंद्राच्या अर्थसंकल्पावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आजचं बजेट हे संमिश्र आहे. नोकरवर्ग आणि व्यापाऱ्यांसाठी काही प्रमाणात दिलासा देण्यात आला आहे. बजेटला खराबही म्हणता येणार नाही आणि चांगलेही म्हणता येणार नाही, असं ते म्हणाले.