Published on
:
01 Feb 2025, 2:27 pm
Updated on
:
01 Feb 2025, 2:27 pm
नागपूर : आजचा केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे, मोदी सरकार सामान्य भारतीयांसोबत भक्कमपणे उभे आहे याचेच हे प्रमाण असून, आज जाहीर झालेल्या योजना व तरतुदी भारताच्या भविष्यकालीन अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या आहेत. मला विश्र्वास आहे नक्कीच, भारत जगावर स्वार होईल, इतकी भक्कम तटबंदी केली गेली. मी अर्थसंकल्पाचे मन:पूर्वक स्वागत करतो. अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर दिली.
ते म्हणाले, पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्त्वात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पातून देशाला नवी गती देण्यासाठी निश्चितपणे पुढाकार घेतला. देशातील मध्यम वर्ग, शेतकरी, उद्योग आणि युवकांसाठी अतिशय कल्याणकारी आणि सशक्त समाजाच्या निर्मितीला साथ देवून सर्वंकष विकास करणारा अर्थसंकल्प आहे.
१२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात करून मध्यमवर्गीयांना दिलासा दिला. शेतकऱ्यांसाठी सुद्धा हा अर्थसंकल्प प्रचंड फायद्याचा ठरला आहे. केंद्र सरकार राज्यांसोबत भागीदारीमध्ये धन धान्य योजना राबवणार आहे. कापूस विकासाकडे विशेष लक्ष्य देण्यात येणार आहे आणि किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ३ लाखांवरून ५ लाख करण्यात आली आहे. उद्योग क्षेत्राला प्रचंड चालना देणारे हे बजेट आहे. महाराष्ट्र स्टार्टअप मध्ये देशात अग्रेसर आहे.
आता स्टार्टअप साठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. स्टार्टअपला मिळण्याऱ्या कर्जात सुद्धा वाढ करण्यात आली आहे. याशिवाय मत्स्य उत्पादनाला चालना देण्यासाठी मोठी योजना प्रस्तावित आहे. दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी १६ लाख कोटींचे करार केले आहेत यामुळे महाराष्ट्रात प्रचंड गुंतवणूक होऊन इथला रोजगार मोठ्या पटीने वाढणार आहे आणि आता केंद्रीय अर्थसंकल्पाचीही याला साथ मिळाली आहे, हे उल्लेखनीय आहे. असे ते म्हणाले.