परभणी शहरातील धार रोडवरील घटना डोक्यात गंभीर दुखापत!
परभणी (Parbhani) : सामाजिक कार्यकर्ते तथा संभाजी सेनेचे शहराध्यक्ष अरुण पवार (Arun Pawar) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. शुक्रवार 31 जानेवारी रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास धार रोडवर पाच ते सहा अज्ञातांनी अरुण पवार यांच्यावर हल्ला केला. यात डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे. अरुण पवार यांच्यावर शासकीय रुग्णालयात (Government Hospital) उपचार करण्यात आले. या घटनेविषयी पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.
सदर घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, अरुण पवार हे दुचाकी (Bike) वाहनाने जात असताना धार रोडवर रात्री साडे अकराच्या सुमारास पाच ते सहा अज्ञातांनी अरुण पवार यांच्यावर हल्ला केला. डोक्यात मारहाण करुन गंभीर जखमी केले. रक्तबंबाळ अरुण पवार यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अरुण पवार हे सामाजिक कार्यात सक्रिय असून मागील काही दिवसांपासून त्यांनी अवैध वाळू विक्री, अवैध गुटखा या विषयावर आवाज उठविला आहे. यातुनच त्यांच्यावर हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणात चौकशी करुण आरोपींवर गुन्हा दाखल (Case Registered) करावा, अशी मागणी संभाजी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.