Dhule : नवीन नियोजन समिती सभागृहात गुइलेन बैरे सिंड्रोम आजाराबाबत बैठक
धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावलPudhari News Network
Published on
:
01 Feb 2025, 11:29 am
Updated on
:
01 Feb 2025, 11:29 am
धुळे : राज्यात गुइलेन बारे सिंड्रोम अर्थात ‘जीबीएस’ची रुग्ण संख्या वाढत असुन गुइलेन बैरे सिंड्रोम आजाराच्या प्रतिबंधासाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्सची स्थापना करावी. असे निर्देश राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले.
शनिवार (दि.1) आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन समिती सभागृहात गुइलेन बैरे सिंड्रोम आजाराबाबत बैठक झाली. या बैठकीस आमदार अमरिशभाई पटेल, आ. किशोर दराडे,आ. काशिराम पावरा,आ. मंजुळा गावित, आ.अनुप अग्रवाल, आ. राघवेंद्र पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिकेच्या आयुक्ता अमिता दगडे पाटील, हिरे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सयाजीराव भामरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दत्ता देगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन बोडके आदी उपस्थित होते.
पालकमंत्री रावल म्हणाले की, गुइलेन बैरे सिंड्रोम अर्थात ‘जीबीएस’हा आजार दूषित पाण्यामुळे आणि न शिजवलेले अन्न मांस खाल्यामुळे होतो. त्यामुळे अशाप्रकारचे अन्न खाण्याचे टाळावे. पाण्याचे व अन्नाचे नमुने अन्न व औषध प्रशासन विभागाने तपासावेत. हिरे वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालयात किमान पाच बेड या आजाराच्या रुग्णांसाठी कार्यान्वित करावे, उपचारासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध करुन घ्यावा. या आजाराबाबत नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी मोठया प्रमाणात जनजागृती करावी. त्याचबरोबर नागरिकांनी घाबरून न जाता या आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरीत सरकारी रुग्णालयात जाऊन तपासणी करुन घ्यावी असेही त्यांनी सांगितले. आजाराच्या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे वैद्यकीय अधिकारी यांनी आपसात समन्वय ठेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.