वाढवणा बु.(Latur) :- हमीभावाने वाढवणा पाटी येथे सोयाबीन (Soyabean) खरेदी केंद्राची लॉगीन आयडीच ब्लॉक झाल्याने दि. २७ पासून येथील काटा बंद झाल्याने शेतकऱ्यांना (Farmers)केंद्रावर सोयाबीनची पाच दिवसांपासून राखण करीत बसावे लागत आहे. काटा होणार, पण कधी? यांचा पत्ताच नसल्याने शेतकऱ्यांची हेळसांड होणारे विदारक चित्र वाढवणा पाटी येथे पाहावयास मिळत आहे.
वाढवणा पाटीवर वाहने पाच दिवसांपासून मुक्कामीच!
यंदा शासनाने सोयाबीनला बाजारपेठेमध्ये कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या मागणीनंतर अखेर सरकारने नाफेड मार्फत आधारभूत किमतीवर सोयाबीन केंद्र सुरु केली. ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली, त्यांची सोयाबीन खरेदी या केंद्रावर सुरु होती. वाढवणा पाटी येथेही खरेदी केंद्र सुरू केले. पण दि. २७ जानेवारीपासून वाढवणा पाटी येथील केद्राची आयडीच ब्लॉक झाल्याचे कळते. तेव्हापासून खरेदी केंद्रावर आलेली वाहने आजपर्यंत काट्याअभावी उभी आहेत.
हेच शेतकऱ्याचे सरकार आहे का?
ही वाहने राखत बसण्याचे काम शेतकऱ्यांना करावे लागत आहे. शिवाय वाहनाचे भाडेही शेतकऱ्यांना पदरमोड करून भरावे लागणार आहे. त्यामुळे शासनाने हे केंद्र शेतकऱ्यांच्या सोयीसाठी उभे केले की, हेळसांड करण्यासाठी, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे माल पिकवायचा, शेतात राखायचा अन् आता खरेदी केंद्रावरही कामधंदा सोडून पाच दिवस राखत बसण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे हेच शेतकऱ्याचे सरकार आहे का? असा सवाल शेतकरी करीत आहेत.