Published on
:
01 Feb 2025, 3:05 pm
Updated on
:
01 Feb 2025, 3:05 pm
नागपूर : रालोआ सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी लोकसभेत मांडला. अर्थसंकल्पात गरीब, मध्यमवर्ग, शेतकरी, युवा, महिला या वर्गावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. दरम्यान अर्थसंकल्पावर राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी, आमदारांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. जाणून घेवूया कोण काय म्हणाले.
शेतकऱ्यांची घोर निराशा : अनिल देशमुख
शेतमालास बाजारात भाव मिळत नाही, नुकसान होऊनही कोणतीही मदत मिळत नाही, यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर सतत वाढत चालला आहे. याचा कोणताही विचार आजच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेला नाही. एकंदरीत कृषी क्षेत्राची आणि शेतकऱ्यांची घोर निराशा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला. शेतीसाठी लागणारी खते, बियाणे, किटकनाशके, औजारे यावर मोठया प्रमाणात जी.एस.टी. लावण्यात आला आहे. तो कमी करण्यासाठी काहीच विचार करण्यात आला नाही. कृषी क्षेत्रात महत्वाची असलेली मनरेगा योजनेला चालणा देण्यासाठी त्याची तरतुद वाढविण्याची आवश्यकता होती. त्यासाठी या अर्थसंकल्पात काहीच तरतुद करण्यात आलेली नाही. असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.
अर्थसंकल्प देशाला प्रगतीच्या मार्गावर नेणारा : भावना गवळी पाटील
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये कृषी, शिक्षण व उद्योग क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठी भेट देत किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ५ लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कर्जासाठी सावकाराच्या दारात जाण्याची गरज राहणार नाही. तसेच आयआयटीची क्षमता वाढवण्यात येणार आहे. देशातील 5 IIT मध्ये अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. परिणामी उद्योग धंद्याला चालना मिळणार आहे. एकूणच हा अर्थसंकल्प देशाला प्रगतीच्या मार्गावर नेणारा असून शेतकरी, उद्दोजक, व्यापारी, युवक, महिला, विद्यार्थी यासह अन्य घटकांच्या हिताचा आहे.
शेतकरी, महिलांना बजेटमुळे दिलासा : आमदार श्याम खोडे
केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन जी यांनी सतत आठव्या वेळा सादर केलेला हा अर्थसंकल्प मध्यमवर्ग व नोकरीपेक्षा लोकांसाठी दिलासादायक असा आहे. इन्कम टॅक्सची मर्यादा 12 लाख रुपये दिल्यामुळे करोडो नोकरी करणाऱ्या लोकांना याचा फायदा होणार आहे. विकसित भारत सर्वश्रेष्ठ भारत याच्या निर्मितीसाठी असलेला हा बजेट आहे. मध्यमवर्गीय शेतकरी, महिला, यांना या बजेटमुळे दिलासा मिळणार आहे. या बजेटमुळे भारताच्या जीडीपी मध्ये निश्चितपणे वाढ होईल सर्व राज्यांना व समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा असा हा बजेट आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. अशा सर्व समावेशक बजेटसाठी मी लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांचे मनापासून अभिनंदन करतो.