नागपूर - आयकराची मर्यादा 12 लाखापर्यंत वाढविण्याचा अनपेक्षित, धाडसी निर्णय केंद्र सरकारने अर्थसंकल्पातून घेतला असून देशाच्या अर्थसंकल्पांच्या इतिहासातले हे क्रांतिकारी पाऊल आहे. या बजेटचा लाभ अधिकाधिक महाराष्ट्राला होईल. विकसित महाराष्ट्राकडे वाटचाल करेल असा विश्वास. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचे विश्लेषण करताना बोलून दाखविला.
मनी बी इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडच्यावतीने ‘अमृतकाल : विकसीत भारत – 2047’ या तीन दिवसीय गुंतवणूकदार प्रशिक्षण परिषदेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी उद्घाटन झाले.
सायंटिफिक सोसायटी लॉन, लक्ष्मीनगर येथील कार्यक्रमाला केडिया सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक स्टॉक मार्केट गुरू विजय केडिया, एनएसईचे चिफ बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर श्रीराम कृष्णन, मनी बीच्या संचालक शिवानी दाणी व मॅनेजिंग डायरेक्टर आशुतोष वखरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, कमी दिवसात अधिक लाभापोटी अलिकडच्या काळात आर्थिक व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात फ्रॉड होत आहेत. जनजागृती व प्रशिक्षणाच्या अभावामुळे अनेकांना जीवनभर कमावलेले पैसे गमावावे लागतात. अर्थसंकल्प गरीब, युवा, शेतकरी आणि महिला याचार घटकांना समर्पित आहे, असे सांगताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर विस्तृत विवेचन केले. विजय केडिया यांनी ‘अमृतकाल’वरील कविता सादर करीत पुढील चार वर्षात भारताची अर्थव्यवस्था टॉप 3 मध्ये राहील, अशी आशा व्यक्त केली.