सध्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभाची जगभरात चर्चा होत आहे. तब्बल 12 वर्षांनी भरलेल्या या महाकुंभात अगदी सामान्यांपासूने ते सिनेविश्वातील कलाकार ते नेतेमंडळीपर्यंत सर्वांनीच सहभाग घेतला. सर्वांनी भाविक म्हणूनच या पवित्र महाकुंभाला भेट दिली. महाकुंभात संगमात स्नान केले.
महाकुंभातील ख्रिस मार्टिनचा व्हिडीओ व्हायरल
यात आता अजून एका मोठ्या नावाचा सहभाग झाला आहे. तो म्हणजे ब्रिटीश पॉप बँड कोल्डप्ले सिंगर ख्रिस मार्टिनचा. ख्रिस मार्टिन त्याची मैत्रीण डकोटा जॉन्सनसोबत महाकुंभात सहभागी झाला आहे. या जोडप्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये दोघेही संगमामध्ये डुबकी मारताना दिसत आहेत.भरत चौधरी नावाच्या एका इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.
27 जानेवारीला क्रिस मार्टिन आणि डकोटा प्रयागराजमध्ये दिसले
27 जानेवारी रोजी प्रयागराजमध्ये क्रिस मार्टिन आणि डकोटा जॉन्सन दिसले होते. दोघेही भगव्या रंगाच्या कपड्यात कारमध्ये बसलेले दिसले. कोल्डप्लेच्या म्युझिकल टूरसाठी ते 16 जानेवारीला भारतात पोहोचले. ख्रिसने त्याच्या टीमसोबत मुंबई आणि अहमदाबादमध्ये कॉन्सर्ट केलं.
त्यांच्या म्युझिक ऑफ द स्फेअर्स टूरचा शेवटचा शो प्रजासत्ताक दिनी अहमदाबाद, भारतातील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. ख्रिस मार्टिनने अहमदाबादमधील कॉन्सर्टमध्ये ‘वंदे मातरम’ आणि ‘मां तुझे सलाम’ सारखी देशभक्तीपर गाणी गाऊन भारतीय चाहत्यांची मने जिंकली. त्यांनी भारत मातेला वंदन करून मैफलीची सांगता केली आणि सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.
महाकुंभात संगमामध्ये डुबकी मारली
त्यानंतर आता क्रिस मार्टिन आणि डकोटा जॉन्सन पुन्हा एकदा भारतीय संस्कृतीचे अनुकरण करताना दिसले. या दोघांनी महाकुंभात सहभागी होत संगमामध्ये डुबकी मारली. यावेळी ख्रिस ख्रिस काळ्या रंगाच्या शॉर्ट्समध्ये दिसला, तर त्याची गर्लफ्रेंड डकोटा कुर्ता-पायजमामध्ये दिसली. या जोडीने संगमात डुबकी मारली आणि हात जोडून प्रार्थनाही केली.
ख्रिसने हात जोडून प्रार्थना केली
व्हिडीओमध्ये ख्रिस मार्टिन हात जोडून श्रद्धेनं आणि भक्तीने प्रार्थना म्हणतानाही दिसत आहे. दरम्यान ज्या अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे त्या व्यक्तीने या व्हिडीओला फार मजेशीर कॅप्शन दिलं आहे.
त्याने लिहिले आहे की, ‘जेव्हा तुम्ही कॉन्सर्टला जाऊ शकत नाही, तेव्हा कलाकार कुंभमेळ्यात तुमच्याकडे येतात. कोल्डप्लेचे ख्रिस मार्टिन आणि डकोटा संगममध्ये डुबकी मारतायत. प्रत्येक विधी त्यांनी आदराने पाळला. सर्वत्र शिव आहे. हा त्यांचाही विश्वास आहे’ असं लिहित त्यांनीही या जोडीची कौतुक केलं आहे. नेटकऱ्यांनीही या व्हिडीओला पसंती देत ख्रिस मार्टिन आणि डकोटाचे कौतुक केलं आहे.