“मी शंभर टक्के सांगू शकतो धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत. धनंजय मुंडे यांनी खूप सोसलं. ते आमच्या अध्यात्माच्या क्षेत्रात असते तर संतपदाला पोहोचले असते”, असं सांगत भगवान बाबा गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. त्यामुळे महंत नामदेव शास्त्री यांच्यावर चोहोबाजूने टीका होत आहे. आता आमदार सदाभाऊ खोत यांनीही महंतांवर टीका केली आहे. सदाभाऊ खोत यांनी एक ट्विट करून महंतांना खोचक टोला लगावला आहे.
“धनंजय मुंडे 100 टक्के गुन्हेगार नाही. इतका त्रास सहन करणारा आमच्या क्षेत्रात संत झाला असता, असं नामदेव शास्त्री म्हणत आहेत. भले तरि देऊं कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी I संत तुकोबांची ही वाणी गावगाड्याला बळ देऊन जाई. इंडियावादी संत जन्मले, वाल्ह्याचा वाल्मिक करून गेले”, असा चिमटा सदाभाऊ खोत यांनी काढला आहे.
काय अधिकार आहे तुम्हाला?
“कायद्यातून जे निष्पन्न होईल, दोषी आहे नाही हे न्यायालय ठरवेल. संत काय बोलत होते? संतांची शिकवण काय होती? संत तुकोबा अमूक अमूक एका समाजाचे संत आहेत असं कधी ऐकलं नाही. संत जनाबाई अमूक अमूक समाजाच्या संत होत्या, असं ऐकलं नाही. या संतांनी कधी राजकीय सीमा ओलांडल्या नव्हत्या. आता इंडियावादी संत जन्माला आले आणि वाल्याचा वाल्मिकी करून गेले. काय अधिकार आहे तुम्हाला बोलायचा?” असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
त्यावर बायबल लिहिलं पाहिजे
“गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. त्याला जातधर्म नसते. पाकीटमार करणाऱ्याला मारझोड होत असते. नाही केली तर आज पाकिट मारलं, उद्या तो दरोडा घालणार, असं सांगतानाच साधू संतांच्या भाषेत सांगायचं म्हणजे हा दांभिकपणा आहे. आरोपींची काय मानसिकता तपासायला हवी होती? मला वाटतं या महंतांचं दर्शन घेतलं पाहिजे. त्यांच्या बोलण्यावर संशोधन झालं पाहिजे. त्यावर बायबल लिहिलं पाहिजे”, अशी खरमरीत टीकाही सदाभाऊंनी केली.
राजकारणाचं गुन्हेगारीकरण करायचं का?
“जे आहे ते सुखात आहोत. समाधानात आहोत असं सांगणारे साधू संत होते. हे राज्य गोरगरीबांसाठी उभं राहावं, रयतेचं राहावं. रयतेला चार दिवस आनंदाचे मिळावे, असा संदेश देणारे संत तुकोबा कुठे आणि दुसऱ्या बाजूला या प्रकरणावर बोलणारे कुठे? संतोष देशमुख यांच्या पत्नी आणि लेकरांच्या डोळ्यातील अश्रूबद्दल तुमच्या भावना काय आहेत? राजकारणाचं गुन्हेगारी करण करायचं आहे का?”, असा सवाल त्यांनी केला.
राजकारणाचं गुन्हेगारीकरण
“अलिकडच्या काळात यशवंतराव चव्हाणांनानंतर वसंतराव नाईक, सुधाकर नाईक अगदी ए आर अंतुलेंपर्यंत राज्यात गुन्हेगारीला आश्रय नव्हता. नंतर प्रस्थापितांचं राजकारण सुरू झालं. धनदांडग्यांचं राजकारण सुरू झालं आणि हे राजकारण गुन्हेगारीच्या आश्रयाखाली वावरायला लागलं. मी काम करायला लागलं असं म्हणणार नाही. राजकारणाची गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचं राजकारण सुरू झालं. त्यातून आम्ही गेलो. एकेकाळी आम्हाला या प्रस्थापितांच्या विरोधात सभा घेता येत नव्हत्या”, असंही ते म्हणाले.
“मुख्यमंत्री हेडमास्तर रुपी आहेत. त्यांचा कायद्याचा चांगला अभ्यास आहे. माझ्यासारख्या माणसाने त्यांना काय सांगावं? संतोष देशमुख हा सामाजिक कार्यकर्ता होता. मामाच्या गावाला जाऊन तो सरपंच झाला. फडणवीस देशमुख कुटुंबीयांना न्याय देतील यात शंका नाही”, असं आमदार सदाभाऊ खोत म्हणाले.