Published on
:
01 Feb 2025, 1:32 pm
Updated on
:
01 Feb 2025, 1:32 pm
केज : जिल्हा मार्गावरील अनधिकृतपणे उभारलेला चबूतरा काढायला विरोध केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून २५ जणांविरुद्ध युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या बाबतची माहिती अशी की, दि. २६ जानेवारी रोजी आनंदगाव गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोरच्या मुख्य चौकात अतिक्रमण करून अनधिकृत चबुतरा बांधत असल्याबाबत माहिती मिळाल्याने बांधकाम उपविभाग केजचे अभियंता युवराज मळेकर व कनिष्ठ अभियंता सचिन कांबळे यांनी त्या ठिकाणी भेट दिली. त्यावेळी त्याठिकाणी अंदाजे ४ मीटर रुंद व ५ मी. लांब एवढ्या जागेत चबुतऱ्याचे अनधिकृत बांधकाम चालू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच ग्रामविकास अधिकारी, आनंदगाव (ता. केज) यांनीही दि. २८ जानेवारी रोजी पत्राद्वारे चबुतऱ्याचे बांधकाम चालू असलेली जागा ही सार्वजनिक बांधकाम खात्याची असल्याचे लेखी कळवले होते.
दि. ३१ जानेवारी रोजी दुपारी २:०० वा. चे सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता सचिन कांबळे, शाखा अभियंता आर. आर. परजणे, तांत्रिक सहाय्यक राजाभाऊ काळे, तांत्रिक सहाय्यक श्रीमंत नकाते, तांत्रिक सहाय्यक बाळासाहेब ढाकणे, युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच मंडळ अधिकारी हजारे व तलाठी हे त्या अनधिकृत बांधकामाचे अतिक्रमण काढण्यासाठी गेले असता गावातील गोविंद गायकवाड, विजयसिंह गायकवाड, रवि गायकवाड, दादासाहेब गायकवाड तसेच इतर २०-२५ लोकांनी एकत्र जमून चबुतऱ्याचे अतिक्रमण काढायला अटकाव केला.
बांधकाम विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांनी पोलीसांसह चबुतऱ्याकडे जायचा प्रयत्न केला असता त्यांची अडवणूक केली. तसेच जर हा चबुतरा काढायचा असेल तर अगोदर आमचे मुडदे पाडा. बाकीच्या गावातील अतिक्रमण तुम्हाला दिसत नाही का. काहीही झाले तरी हा चबुतरा तुम्हाला काढू देणार नाही. असे बोलून हुज्जत घातली. यावेळी यूसूफवडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी त्या सर्वांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून चतुबऱ्याचे अतिक्रमण काढाल; तर तुम्हाला पाहून घेऊ. अशी धमकी दिली.
त्यामुळे उपविभागीय अभियंता युवराज मळेकर यांच्या तक्रारी वरून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गोविंद गायकवाड, विजयसिंह गायकवाड, रवि गायकवाड, जगन गायकवाड (सर्व रा. आनंदगाव) यांच्यासह २५ अनोळखी इसमां विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल भगवान खेडकर हे याप्रकरणी तपास करीत आहेत.