Published on
:
01 Feb 2025, 3:48 pm
Updated on
:
01 Feb 2025, 3:48 pm
रत्नागिरी : राज्याचे उद्योग व मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यांना आज अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. या सन्मानाने भावूक होत उदय सामंत यांनी आपल्या आई-वडिलांची इच्छा पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली.
अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या विशेष दीक्षांत समारंभात मंत्री उदय सामंत यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. या सोहळ्याला विद्यापीठाचे संस्थापक डॉ. अजिंक्य डी.वाय. पाटील, विद्यापीठाचे अधिकारी, विद्यार्थी आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
...आणि उदय सामंत झाले भावूक
डॉक्टरेट मिळाल्यानंतर झालेल्या सत्कार समारंभात बोलताना उदय सामंत म्हणाले की, "आजपासून माझ्या नावासमोर 'डॉक्टर' लागले आहे. माझ्या आई-वडिलांची इच्छा होती की, मी एमबीबीएस करून डॉक्टर व्हावं, पण नियतीने मला वेगळ्या मार्गावर आणले. समाजासाठी आणि राज्यासाठी कार्य करताना आज विद्यापीठाने माझ्या कार्याची दखल घेतली, याचा मला अभिमान वाटतो."
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या मंत्रिपदाच्या काळात घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांची आठवण त्यांनी करून दिली. "कोरोना काळात परीक्षा घ्यायच्या की नाही, हा प्रश्न उभा राहिला होता. तेव्हा मी विद्यार्थ्यांच्या मतांचा विचार करून परीक्षा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी माझे आभार मानले होते. तो निर्णय माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या निर्णयांपैकी एक होता," असे ते म्हणाले.
मराठी भाषा आणि शिक्षण क्षेत्रात योगदानाचा संकल्प
उद्योग मंत्री म्हणून महाराष्ट्रात रोजगारनिर्मितीवर भर देत असल्याचे सांगत त्यांनी पंधरा लाख सत्तर हजार कोटींचे गुंतवणूक करार (MOU) केले असल्याचे जाहीर केले. तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि परदेशी विद्यार्थ्यांना मराठी शिकवण्यासाठी अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाबरोबर विशेष अभ्यासक्रम सुरू करण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. "माझी इच्छा आहे की, परदेशातील मराठी मुलांना मातृभाषेचा अभिमान वाटावा आणि ती सहज शिकता यावी. यासाठी विद्यापीठाबरोबर लवकरच पाऊले उचलली जातील," असे उदय सामंत यांनी सांगितले. हा सन्मान उदय सामंत यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन देण्यात आला. त्यांच्या या यशस्वी प्रवासासाठी विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.