तलवारी म्यान झाल्या! आज रात्र मतदाराची, विनवण्या आणि आळवण्यांची

3 days ago 2

येऊन येऊन येणार कोण… कोण आला रे कोण आला… झिंदाबाद झिंदाबाद… ताई-माई-अक्का विचार करा पक्का… अशा घोषणा आणि उमेदवारांच्या प्रचार सभा, दिग्गज राजकीय नेते, अभिनेते यांच्या रॅलीनी राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. सोशल मीडियासह गल्लीबोळातून सुरू असलेला उमेदवारांचा प्रचार तसेच राजकीय नेत्यांच्या जाहीर सभांतून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडत होत्या. गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून विधानसभा निवणुकीच्या रणधुमाळीत एकमेकांच्या विरोधात उपसलेल्या प्रचाराच्या राजकीय तलवारी अखेर आज म्यान झाल्या. आता प्रतीक्षा 20 नोव्हेंबरला होणाऱया मतदानाची… तोपर्यंत छुपा प्रचार मात्र सुरू राहणार आहे. आजची रात्र मतदारांची असून मतदारांना आपलं करण्यासाठी विनवण्या आणि आळवण्या सर्वपक्षीय कार्यकत्यांकडून केल्या जाणार आहेत.

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुरू असलेल्या जाहीर प्रचाराची सांगता झाली. निवडणूक प्रचाराच्या शेवटव्या दिवशी दिग्गज नेत्यांनी आपल्या होमग्राऊंडवर सभा, प्रचार फेऱया, बाईक रॅली काढून दिवस गाजवला. या वेळी निवडणुकीचे वैशिष्टय़ म्हणजे प्रचार करताना बहुतांश उमेदवारांकडून हायटेक प्रचार यंत्रणेचा उपयोग केला गेला. जाहीर प्रचार थांबला असला तरी पुढचे दोन दिवस उमेदवारांसाठी महत्त्वाचे असणार आहेत. या काळात मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटीगाठी, गुप्त बैठका, राजकीय डावपेच रंगतील. आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला पराभूत करण्यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरण्यास सुरुवात होईल. छुप्या पद्धतीने होणाऱया या प्रचारावर निवडणूक यंत्रणांचेदेखील बारकाईने लक्ष राहणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

शांतता कालावधीत प्रचार केल्यास 2 वर्षांचा तुरुंगवास

मतदान संपेपर्यंतच्या पुढील 48 तासांमध्ये मतदारांवर प्रभाव टाकणारा प्रचार करण्यास अथवा प्रचारात सहभागी होण्यास मनाई आहे. या अटींचे उल्लंघन झाल्यास 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड अथवा दोन्ही शिक्षा अशी तरतूद कायद्यात असल्याची माहिती देण्यात आली.

उमेदवाराच्या अधिकृत परवानगीशिवाय संबंधित उमेदवाराच्या निवडणुकीचा प्रचार किंवा निवडणुकीसाठी खर्च करण्याच्या हेतूने इतर सर्व गोष्टींसह जाहिराती, प्रचार किंवा प्रकाशनासाठी खर्च करण्यास मनाई केली गेली आहे.

पोलीस इन ऍक्शन!

विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. 104 दाखलेबाज गुंडांच्या अटकेचे आदेश देण्यात आले असून 1343 जणांना तडीपारीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. 396 अवैध रिव्हॉल्व्हर्स, 1856 धारदार शस्त्रs जप्त करण्यात आली आहेत.

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ही माहिती दिली आहे. महाराष्ट्राची तीन हजार किमीपेक्षा जास्त सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा अशा सहा राज्यांसह दादरा, नगर, हवेली आणि दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशाशी जोडलेली आहे. ही राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांसोबत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी ते पोलीस महासंचालक स्तरावर आंतरराज्यीय समन्वय, गुन्हे आणि गुन्हेगारांशी संबंधित माहितीची देवाणघेवाण याबाबत बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर कारवाईचे आदेश जारी करण्यात आले. निवडणूक कालावधीत बंदोबस्ताकरिता सीएपीएफ, एसएपी, एसआरपीएफच्या पंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. होमगार्डसुद्धा पुरेशा प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून 56 हजार 631 परवानाधारक रिव्हॉल्व्हर्स व पिस्तुले ताब्यात घेण्यात आली आहेत. 17 नोव्हेंबरपर्यंत एकूण 408.91 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मुंबईच्या पूर्वउपनगरातील 113 रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. वारंवार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे, गुन्हे करून सार्वजनिक शांतता भंग करणाऱया गुन्हेगारांचा त्यात समावेश आहे.

लक्ष्मीदर्शनासह रात्रीस खेळ चाले

मतदानापूर्वीचे दोन दिवस उमेदवारांसाठी महत्त्वाचे आहेत. याकाळत रात्रीच्यावेळी छुप्या पद्धतीने मतदारसंघातील छोटीमोठी मंडळे, गृहनिर्माण सोसायटय़ांचे पदाधिकारी आणि मतदारांच्या गृप्त भेटगाठी घेऊन त्यांना आपलं करण्याचा प्रयत्न केला जाईल. लक्ष्मीदर्शनासह, सहलींचे पॅकजे देखील मतदारांना आकर्षित करण्यासाठी दिले जाईल. गृहीणींना भेट वस्तू, साडीवाटप असे प्रकार सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडून आधीपासूनच सुरू आहेत.  त्यामुळे निवडणूक विभाग, पोलीस यंत्रणा यांची स्थिर आणि फिरती पथके अधिक सक्रिय राहणार आहेत.

व्हीआयपी बंदोबस्तासाठी ड्रोनचा वापर

व्हीआयपी बंदोबस्त आणि कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित कामासाठी पोलिसांकडून ड्रोनचा वापर केला जात असल्याची माहितीही देण्यात आली.

कार्यकर्त्यांचे जागते रहो

जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर आता कुजबूज प्रचाराला जोर आला आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांची फौज उतरवण्यात आली आहे. घरोघरी, गल्लोगल्ली कार्यकर्ते धडकू लागले आहेत. आचारसंहितेच्या कचाटय़ात पकडले जाणार नाही, याची दक्षता घेऊन हा प्रचार केला जात असल्याचे चित्र सर्वत्र आहे. त्याचवेळी मतदारांना प्रलोभन दाखवले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन काही कार्यकर्त्यांना जागता पहारा देण्याच्याही सूचना दिल्या गेल्या आहेत. दोन रात्री सर्वांसाठीच महत्त्वाच्या आहेत.

मुंबईत 420 उमेदवार नशीब आजमावणार

  • मुंबईत एकूण 36 विधानसभा मतदार संघांसाठी होणाऱया निवडणुकीसाठी विविध पक्ष-अपक्ष असे मुंबई शहरातून 105 तर  उपनगरमधून 315 असे एकूण 420 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यासाठी 10 हजार 117 मतदान पेंद्रे असणार आहेत.
  • 76 मतदान केंद्रे क्रिटिकल जाहीर करण्यात आली आहेत.
  • 10 टक्केपेक्षा कमी मतदान होणारी ही केंद्रे आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article