विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. सत्ता स्थापनेसाठी महायुतीकडून फोडाफोडी होऊ शकते. त्यामुळे महाविकास आघाडीही सावध झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी आज आपल्या पक्षाचे नेते आणि उमेदवारांशी विविध माध्यमांतून संवाद साधला. सत्तापिपासू महायुती कोणत्याही थराला जाऊ शकते. त्यामुळे अत्यंत दक्ष रहा, सावध रहा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
महाराष्ट्राचा कौल उद्या स्पष्ट होणार आहे. सर्वांनाच निकालाची धाकधूक असून राजकीय घडमोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीने निकालाच्या पार्श्वभूमीवर आज आढावा घेतला. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या प्रत्येक उमेदवारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला, तसेच मतदारसंघांमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱयांशीही त्यांनी चर्चा करून ईव्हीएम मतदान तसेच टपाली मतदानाबाबत कोणती खबरदारी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच महत्त्वाच्या सूचनाही केल्या. शिवसेनेच्या सर्व प्रवक्त्यांची बैठक बोलवून निकालानंतर आपली भूमिका कोणत्या पद्धतीने मांडायची याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
शरद पवार यांनीही आज राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांची ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनीही मार्गदर्शन केले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किती मतदान झाले आणि उद्या निकालाच्या वेळी काही आक्षेपार्ह आढळले तर हरकती कशा प्रकारे नोंदवायच्या याबद्दल उमेदवारांना त्यांनी माहिती दिली. मतमोजणी संपताना सी-17 फॉर्मवरील माहिती काय आहे हे बारकाईने तपासण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्याचे समजते.
काँग्रेसकडून सर्व आमदारांना मुंबईत आणण्याची व्यवस्था
काँग्रेसनेही आपल्या उमेदवारांना मार्गदर्शन केले. महायुती आमदारांची पह्डापह्डी करण्यासाठी काहीही करू शकते. त्यामुळे काँग्रेसचा कुणीही आमदार फुटणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या. 26 तारखेपर्यंतच सरकार स्थापन करण्याची मुदत असल्याने निकालानंतर लवकरात लवकर सत्तास्थापनेचा दावा करावा लागेल. त्यामुळे उद्याच सर्व आमदारांना मुंबईत आणण्याची व्यवस्था काँग्रेसने केली आहे.