मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर घोषणाबाजी करताना माजी खासदार हेमंत गोडसे, उपनेते अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, गणेश कदम, दिनेश चव्हाण आदी.Pudhari
Published on
:
22 Jan 2025, 4:02 am
Updated on
:
22 Jan 2025, 4:02 am
नाशिक : नाशिकच्या पालकमंत्रीपदावर भाजपने दावा कायम ठेवला असताना पुन्हा दादा भुसेंनाच पालकमंत्रीपद मिळण्यासाठी शिवसेने (शिंदे गटा) दबावतंत्राचा अवलंब सुरू केला आहे. अयोध्येतील श्रीरामलल्ला प्रतिष्ठापनेच्या वर्षपूर्तीनिमित्त शिवसेनेतील एका गटाकडून नाशिकमध्ये श्रीराम उत्सवाच्या आयोजनाची तयारी सुरू असताना दुसऱ्या गटाने भुसे यांच्या पालकमंत्रीपदासाठी थेट मुंबई गाठत पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर घोषणाबाजी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी शनिवारी राज्यातील ३६ जिल्ह्यांचे पालकमंत्री घोषित केले. त्यात नाशिकच्या पालकमंत्रीपदी भाजपचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तर रायगडच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या व महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली होती. मात्र नाशिक व रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीला शिवसेनेकडून विरोध झाला. रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची नियुक्तीच्या मागणीसाठी शिवसैनिक मुंबई-गोवा महामार्गावर उतरले. नाशिकचे पालकमंत्रीपद पुन्हा दादा भुसे यांना मिळावे, अशी मागणीही शिवसेनेकडून केली गेली. दुसरीकडे रायगड जिल्ह्यात पाच आमदार असल्याने पालकमंत्री पद शिवसेनेला मिळावे अशी मागणी असल्याने नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सात आमदार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला पालकमंत्री पद द्यावे, अशी मागणी करण्यात आली. महायुतीत पालकमंत्रीपदावरून वाढता वाद लक्षात घेता नाशिक व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची नियुक्तीला शासनाकडून २४ तासांतच स्थगिती देण्यात आली. पालकमंत्रीपदावर भाजपने दावा कायम ठेवला असून गिरीश महाजन यांची नियुक्ती कायम करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे माजी खासदार हेमंत गोडसे व उपनेते अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मंगळवारी(दि.२१) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील निवासस्थानासमोर जोरदार घोषणाबाजी करत दादा भुसे यांच्याकडे नाशिकचे पालकत्व देण्याची मागणी केली आली. जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, गणेश कदम, दिनेश चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.
दादा भुसे यांनाच नाशिकचे पालकमंत्री करण्याची मागणी यावेळी गोडसे, बोरस्ते यांनी केली. जिल्ह्याच्या विकासात दादा भुसे यांचा मोठा वाटा असल्याचा दावा करत स्थानिक समस्या आणि आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भुसे यांनाच पालकमंत्री करण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी देखील भुसे यांच्या पालकमंत्रीपदावरील नियुक्तीचा प्रश्न प्रतिष्ठेचा केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर या वादावर निर्णय होणार आहे.