मद्यपी पतीपासून पत्नीची सुटका; कायमस्वरूपी पोटगीसह मिळणार स्त्रीधनFile Photo
Published on
:
22 Jan 2025, 6:25 am
Updated on
:
22 Jan 2025, 6:25 am
पुणे: मद्यपी पतीपासून होणारी मारहाण, शिवीगाळ याखेरीज सततच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळलेल्या पत्नीला न्यायालयीन लढाईच्या एक वर्षानंतर दिलासा मिळाला आहे. तिला कायमस्वरूपी पोटगी स्वरूपात सहा लाख रुपये दहा महिन्यांच्या आत देण्यासह मुलीचा ताबा, लग्नाचा संपूर्ण खर्च, स्त्रीधन, भेटवस्तू परत करावेत तसेच पतीने तिच्या कुटुंबीयांशी संपर्क करू नये, असा आदेश कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश शुभांगी यादव यांनी पतीला दिला आहे.
विजय आणि विजया (दोघांची नावे बदललेली आहेत) यांचा 2005 मध्ये प्रेमविवाह झाला. लग्नाच्या काही वर्षांनंतर विजय दारूच्या आहारी गेला. दरम्यान, व्यसनापायी विजयने तिचा प्रचंड मानसिक अन् शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. त्याला कंटाळून तिने पोलिस ठाण्यात तक्रार केली. कुटुंब आणि मुलाच्या दैनंदिन गरजा ती स्वतःच पूर्ण करत होती.
पती काहीही करत नव्हता आणि मद्यपानाच्या सवयीमुळे संपूर्ण कुटुंबाची परिस्थिती बिघडली होती. त्यामुळे ती 2013 पासून पतीपासून विभक्त राहू लागली. पतीने तिच्यासह मुलीवर सतत मानसिक आणि शारीरिक अत्याचार केले.
त्यामुळे त्याच्यापासून विजयाने वेगळे होण्याचा मार्ग पत्करत वकिलामार्फत घटस्फोटाचा अर्ज न्यायालयात दाखल केला. पत्नीने पतीला परस्परसंमतीने घटस्फोटाची विनंती केली. मात्र, पतीने प्रत्येक वेळी नकार दिला आणि पत्नीला इशारा दिला की, तो पत्नीला इतक्या सहजासहजी मुक्त होऊ देणार नाही. मात्र न्यायालयाने पत्नीच्या बाजूने आदेश देत पत्नीच्या घटस्फोट अर्ज मंजूर केला.